नागपुरात अर्थसंकल्पीय सभेत विरोधकांनी वाजविला बॅण्ड, बाटल्याही फेकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 10:18 PM2022-02-21T22:18:26+5:302022-02-21T22:21:24+5:30
Nagpur News नागपुरात अर्थसंकल्पीय सभेपूर्वीच विरोधकांनी ‘ढोल बजाव, जिल्हा परिषद जगाव’ असा सूर काढीत अख्ख्या जिल्हा परिषदेत घोटाळ्याच्या निषेधार्थ ढोल बदडला.
नागपूर : अर्थसंकल्पीय सभेपूर्वीच विरोधकांनी ‘ढोल बजाव, जिल्हा परिषद जगाव’ असा सूर काढीत अख्ख्या जिल्हा परिषदेत घोटाळ्याच्या निषेधार्थ ढोल बदडला. त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय सभेपूर्वी उमटलेदेखील. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधाऱ्यांची गोची करण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्ताधारी सदस्यांनीच केला. पण, विरोधकांना सत्ताधाऱ्यांची नाराजी कॅश करता आली नाही. विरोधकांनी विरोधाचा सूर जरा जास्त आळवला. बाटल्यांची फेकाफेक आणि हमरातुमरीवरही वेळ आली. हा संताप बघून अध्यक्षांनी सभाच गुंडाळून घेतली. पण या अर्थसंकल्पावर गटबाजीची ‘छाया’ स्पष्ट दिसून आली.
सभापती भारती पाटील यांनी २०२१-२२चा सुधारित अर्थसंकल्प सादर करताना १७ सामूहिक निधीला कात्री लावली. सत्ताधारी सदस्य नाना कंभाले यांनी त्याला विरोध केला. या निधीला कात्री लावण्याच्या कारणासह कुठल्या विभागाकडे निधी वळता केला, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते आतिश उमरेसह महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेनेचे सदस्य संजय झाडे यांनी निधी कमी केल्याचा विरोध केला. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाला कात्री लावण्यासह पुढील आर्थिक वर्षात निधी कमी देण्याचा मुद्दादेखील नाना कंभाले यांनी सभागृहात उचलून धरला. काँग्रेसचे सदस्य अरुण हटवार यांनी निधीला कात्री लावण्यास विरोध दर्शविला. सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून प्रश्न उचलण्यात येत असल्याने सत्ताधाऱ्यांची अडचण झाली. दरम्यान, सत्तापक्ष नेत्या लेकुरवाळे यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्याची मागणी केली. अध्यक्षा बर्वे यांनी त्याला दुजोरा दिला. परंतु सत्ताधारी सदस्यांनी विना उत्तर अर्थसंकल्प मंजुरीला विरोध असल्याचा सूर काढला. कृषी व पशुसंवर्धन विभागाला निधी वाढवून देण्याचा ठराव घेण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर अर्थसंकल्पात असलेल्या त्रुटी दूर करण्यात येतील. सूचना व सुधारणेसह अर्थसंकल्प मंजूर करण्याची सूचना अनेकांनी केली. अध्यक्षा बर्वे यांनी अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे जाहीर केले.
- त्या अधिकाऱ्याला सभागृहात उभे करा
शेळी व गाय गट वाटप योजना निकषानुसार राबविण्यात आली नसल्याचा आरोप शिवसेनेचे संजय झाडे यांच्यासह विरोध पक्षनेते आतिष उमरे, व्यंकट कारेमोरे, कैलास बरबटे, सुभाष गुजरकर, राधा अग्रवाल यांनी चांगलाच ताणून धरला. ही योजना ज्या सल्लागाराला राबवायला दिली आहे. त्याला सभागृहापुढे उभे करा, अशी सभागृहाला मागणी केली. पण सत्ताधारी काही सदस्यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला. वादावादीवर विषय आला. बाटल्यांची फेकाफेक झाली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृह गुंडाळले.
- अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार वित्त समितीला आहे. वित्त समितीत ठरल्यानुसार अर्थसंकल्प नाही. कृषी व पशुसंवर्धनसह काही विभागाला वित्त समितीच्या विरोधात जाऊन कात्री लावण्यात आली. वित्त अधिकाऱ्यांची तक्रार सीईओंकडे करणार आहोत.
नाना कंभाले, सदस्य, जि.प.
- विरोधकांची सभा चालू देण्याची मानसिकताच नव्हती. त्यामुळेच त्यांनी बाटल्या आपटल्या. महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नाईलाजास्तव ही सभा वेळीच संपवावी लागली. विरोधक सभागृहात गोंधळ घालण्याच्या भूमिकेतूनच आले होते.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि. प.
- अध्यक्षांनी लोकशाहीचे हनन केले आहे. आम्ही जि. प.तील भ्रष्टाचार उघड करणार होतो. भ्रष्टाचार लपविण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी सभा संपविण्याचा घाट घातला. आम्ही या सर्व विषयांवर चर्चेस तयार असताना अध्यक्षांनी सभा संपविली. त्यामुळे अध्यक्षांनी सदस्यांचे मुद्दे समजून घेण्यासाठी पुन्हा सभा बोलवावी. यासाठी आम्ही विभागीय आयुक्तांसह सीईओ, पालकमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत.
आतीश उमरे, विरोधी पक्षनेते, जि.प.