कन्वेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा साकारणार! -सामाजिक न्याय विभाग
By नरेश डोंगरे | Published: March 2, 2024 01:37 AM2024-03-02T01:37:43+5:302024-03-02T01:38:04+5:30
अतिरक्त २.८१ कोटींच्या खर्चाला मान्यता
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता या सेंटरचे मुख्य आकर्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ४० फुट उंच ब्रांझची प्रतिमा राहणार आहे. त्यासाठी येणाऱ्या २.८१ कोटींच्या अतिरिक्त खर्चाला राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाकडून मान्यता मिळाली आहे.
कामठी मार्गावरील या आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरच्या निर्मितीसाठी १२८.६८ कोटींची रक्कम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देण्यात आली आहे. त्यातून या कन्वेंशन सेंटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मुळ प्रशासकीय मान्यता ११३.७४ कोटी रुपयांची असून त्यात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसाठी २.२३ कोटीच्या रकमेचाही समावेश होता. मात्र, या प्रतिमेसाठी ५.४ कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे उर्वरित २.८१ कोटींच्या निधी अभावी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे काम थांबले होते. आता या अतिरिक्त खर्चाला मान्यता मिळाल्याची माहिती समाज कल्याण विभाग नागपूर कडून देण्यात आली आहे.
असे आहे कन्वेंशन सेंटर
या प्रकल्पात बेसमेंटची पार्किंग, लिफ्ट, पहिल्या माळ्यावर बॅक्वेट हॉल, बिझनेस सेंटर आणि रिसेप्शन, मिडिया सेंटर हॉल, प्रतिक्षालय, दुसऱ्या माळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर फॉउंडेशन ऑफिस, रेस्टॉरेंट, गेस्ट रूम आणि बाबासाहेबांची प्रतिमा, तिसऱ्या माळ्यावर वाचनालय, बुद्धिस्ट स्टडिज डिव्हीजन, रिसर्च सेंटर तर चवथ्या माळ्यावर म्युजिअम आणि आर्ट गॅलरी, ऑडिटोरिअम, पाचव्या माळ्यावर गेस्ट रूम ट्रेनिंग हॉल, स्टोअर रूम, गॅलरी आदींचा समावेश आहे.