अटल महाआरोग्य शिबिर; दुर्धर आजाराच्या ४२ हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:06 AM2018-10-29T11:06:07+5:302018-10-29T11:08:04+5:30

प्रत्येक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Atal health Camp; Treatment of 42,000 patients with ill health | अटल महाआरोग्य शिबिर; दुर्धर आजाराच्या ४२ हजार रुग्णांवर उपचार

अटल महाआरोग्य शिबिर; दुर्धर आजाराच्या ४२ हजार रुग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्दे नेत्ररोगाचे सर्वाधिक रुग्णकर्करोगाच्या १८७ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध दुर्धर आजारांच्या एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. शिबिरात ४५० वरिष्ठ डॉक्टर, १०० अधिपरिसेविका, ४५० आशा वर्कर, १०० फार्मासिस्ट व जवळपास अडीच हजार स्वयंसेवकानी आपली सेवा दिली.
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या शिबिरात रुग्णांनी ७ वाजतापासूनच येण्यास सुरुवात केली होती. ८ वाजतापासून रुग्णांची नोंदणी सुरू झाली. नोंदणी कक्षात असलेल्या इंटर्न्स व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रुग्णांची नोंदणी घेत त्यांची स्वतंत्र फाईल तयार करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करीत होते. रुग्णांची संख्या मोठी असलीतरी कुठेच गर्दी नव्हती. शिस्तबद्ध पद्धतीने रुग्णांना उपचार व औषधे उपलब्ध करून देण्यात आले होते. शिबिरात सुपर स्पेशालिटी तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक रुग्णांच्या आजाराचे निदान होऊन पुढील उपचाराची दिशाही ठरली. परिणामी शिबिरातून बाहेर पडताना रुग्णांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते.

१८२७ रुग्णांना चष्म्यांचे वाटप
महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, महाआरोग्य शिबिराला ४२,१५५ रुग्णांनी उपचार घेतले. यातील ८९७५ रुग्ण नेत्ररोगाशी संबंधित आहेत. १८२७ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित रुग्णांमध्ये मोतिबिंदू, काचबिंदू व इतरही आजाराचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर लवकरच उपचार व शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाईल. उपचारापासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही जोशी म्हणाले.

डेंग्यू, स्क्रब टायफसच्याही रुग्णांनी घेतला उपचार
नेत्ररोगानंतर सर्वाधिक गर्दी मेडिसीन विभागात होती. सायंकाळपर्यंत ७१२५ रुग्णांनी उपचार घेतले. विविध आजारांसोबतच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांचाही समावेश होता. पुढील उपचारासाठी त्यांना मेयो, मेडिकलमध्ये तर काहींना खासगी रुग्णालयात बोलविण्यात आले.

हिप, नी रिप्लेसमेंट व स्पाईनचेही रुग्ण
प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये गुडघे (नी) व कंबरेच्या खुब्याचा (हिप) आजार मोठ्य़ा प्रमाणात आढळून येतो. यावरील प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दीड लाख ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु महाआरोग्य शिबिरात अशा सर्व रुग्णांना शासनाच्या योजनेत समावून त्यांच्यावर नि:शुल्क उपचार केले जाणार आहेत. शिबिरात स्पाईनसह, जुन्या फ्रॅक्चरच्या रुग्णांवर उपचार करून पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात बोलवून घेण्यात आले. विशेष म्हणजे, हजारावर रुग्णांची ‘बीएमडी’ तपासणीही करण्यात आली. शिबिरातील या अस्थिव्यंगोपचाराचा बाह्यरुग्ण विभाग लक्ष वेधून घेणारा ठरला.

औषध वितरणाची विशेष सोय
शिबिरात औषध वितरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बाह्यरुग्ण विभागातून बाहेर पडलेल्या रुग्णाला औषध वितरण विभागापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली.

महाआरोग्य शिबिरात रुग्णाचा मृत्यू
अटल महाआरोग्य शिबिरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. विजय कांबळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार, विजय कांबळे हे शिबिरात नोंदणी केंद्राकडे जात असतानाच त्यांना अचानक चक्कर आली व खाली पडले. स्वयंसेवकांनी त्यांना उचलून तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेले. मेडिकलच्या अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत्यू झाल्याची माहिती दिली.

‘ब्रेस्ट कॅन्सर’ची तपासणी
शिबिरात सहभागी झालेल्या बहुसंख्य महिलांची यंत्राद्वारे ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची तपासणी करण्यात आली. या शिवाय १८७ कॅन्सर रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात बोलावून घेतले आहे. यावेळी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी विशेष सेवा दिली.

Web Title: Atal health Camp; Treatment of 42,000 patients with ill health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य