अटल आरोग्य महाशिबिर : राज्यभरातील ७५० तज्ज्ञ डॉक्टर, ८० ओपीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:30 PM2018-10-27T23:30:27+5:302018-10-27T23:32:44+5:30
अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीे शिबिर परिसरात ८० ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथीचे ७५० डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे ५५ हजार रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीे शिबिर परिसरात ८० ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथीचे ७५० डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे ५५ हजार रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
सेंट्रल बाजार रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात अटल आरोग्य शिबिराच्या आयोजनाचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. त्याप्रसंगी शिबिरासाठीचे स्वयंसेवक, विविध समित्यांच्या प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार मंडळाचे मुन्ना यादव, आरोग्य महाशिबिराचे आयोजक तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, समन्वय समिती प्रमुख प्रा. राजू हडप आदी उपस्थित होते.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, ३४ हजार नागरिकांची पूर्व तपासणी करण्यात आली असून त्या सर्व रुग्णांची राज्यातील नामांकित डॉक्टरांमार्फत शिबिरात तपासणी झाल्यानंतर नागपूर येथेच सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.सुमारे १० हजार रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गरीब व गरजू सर्व रुग्णांना नि:शुल्क भोजनाची सुविधा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन
महाशिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार तसेच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील. आरोग्य महाशिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असून यात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदू रोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, कर्करोग, दंतरोग, जनरल मेडिसीन, क्षयरोग, लट्ठपणा, मानसिक आरोग्य, जेनेटिक विकार, आयुष आदी आजाराची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.