नवसंशोधकांचा शोध घेणार ‘अटल प्रयोगशाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:30 AM2018-10-23T11:30:28+5:302018-10-23T11:31:04+5:30
शालेय जीवनापासून नवीन संशोधक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या नीती आयोगांतर्गत ‘अटल प्रयोगशाळा’ आता ग्रामीण भागातही आपल्या पाऊलखुणा रोवत नवसंशोधकांचा शोध घेणार आहे.
अभय लांजेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : विद्यार्थीदशेत असतानाच संशोधकवृत्ती वाढीला लागावी. त्यांच्यातील नाविन्यता, प्रायोगिकवृत्ती, क्रियाशीलता, कल्पकता आदींना बळ मिळावे. अगदी शालेय जीवनापासून नवीन संशोधक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या नीती आयोगांतर्गत ‘अटल प्रयोगशाळा’ आता ग्रामीण भागातही आपल्या पाऊलखुणा रोवत नवसंशोधकांचा शोध घेणार आहे.
‘अटल टिंकरिंग लॅब’या योजनेंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात देशभरातील २,४४१ शाळा आणि संस्थांना सदर प्रयोगशील उपक्रमास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील १२९ शाळा आणि संस्थांचा समावेश आहे. विदर्भातील नामांकित शाळांपैकी एक उमरेड येथील जीवन विकास वनिता विद्यालयात या प्रयोगशाळेचा उद्या, २३ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. विशेषत: सदर शाळेचा यंदा ‘सुवर्ण महोत्सव’आहे. प्रयोगशाळा आणि सुवर्ण महोत्सव हा ‘दुग्धशर्करा’ योग साधल्या जात असल्याने जीवन शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, पालक आणि पाल्यांमध्ये यानिमित्ताने आनंद व्यक्त होत आहे.
सदर उपक्रमासाठी प्रत्येक मंजूर झालेल्या शाळा आणि संस्थांना एकूण २० लाख रुपयांचा निधी मिळणार असून, सदर शाळेला १२ लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात आलेला आहे. दहा लाख रुपयांचा निधी प्रयोगशाळेसाठी खर्च करण्यात आला आहे.प्रत्येक वर्षी सलग पाच वर्षे देखरेख शुल्क म्हणून दोन लाख रुपयांची तरतूदही सदर प्रकल्पाच्या २० लाख रुपयांच्या निधीत समाविष्ट आहे. सदर प्र्रयोगशाळा परिसरातील शाळांमधील नवसंशोधकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक ठरेल, असा आत्मविश्वास संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. श्रा.गो. पराते, कार्यवाह प्रशांत सपाटे, मुख्याध्यापिका विभा भुसारी यांनी व्यक्त केला.