पॉझिटिव्ह रुग्णाबाबत मनपा कार्यालयातच अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:23 PM2020-08-12T20:23:13+5:302020-08-12T20:25:06+5:30
सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यात काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतरही संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाही, निर्जंतुकीकरण नाही, अशी अनास्था असल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यात काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतरही संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाही, निर्जंतुकीकरण नाही, अशी अनास्था असल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.
सत्तापक्ष कार्यालयातील एक कर्मचारी दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे होते. तसेच येथील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणे अपेक्षित होते. मात्र कर्मचाऱ्यांना यासंदर्भात कुठल्याही स्वरूपाच्या सूचना प्रशासनाकडून मिळालेल्या नाहीत. वास्तविक खबरदारी म्हणून पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले कर्मचारी व अन्य व्यक्तींची तपासणी होणे अपेक्षित होते.
मनपा मुख्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी फाईल घेऊन व अन्य कामानिमित्त इतर विभागात फिरत असतात. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या विभागातही त्यांची ये-जा सुरू असते. अशा सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. आरोग्य, अग्निशमन विभागासह अन्य विभागातही काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. अग्निशमन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु अन्य विभागात संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.