कसरती खेळकरी भटका सय्यद समाज आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:17+5:302021-04-28T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गावोगावी फिरून कसरतीचे खेळ दाखवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कसरती खेळकरी भटका सय्यद मुस्लिम समाज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावोगावी फिरून कसरतीचे खेळ दाखवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कसरती खेळकरी भटका सय्यद मुस्लिम समाज कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समाजाला शासकीय मदत उपलब्ध करून देण्याची मागणी कसरती खेळकरी समाज सेवाभावी संस्था, आष्टी, बीड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सय्यद समाज हा मुख्यत्वे आष्टी-मुर्शदपूर, बीड येथे वास्तव्याला आहे. गावोगावी जाऊन अचंबित करणाऱ्या कसरतींचे प्रदर्शन करून आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीतून हा समाज आपली उपजीविका चालवितो. वंशपरंपरेने सततची भटकंती असल्याने या समाजाच्या कोणत्याही लोकांकडे जमीनजुमला नाही. कायमचे दारिद्र्य भोगणारा हा समाज कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीत पुरता भरडला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकतेच राज्यातील कामगारांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अशाच प्रकारचे विशेष पॅकेज अंतर्गतचे सहकार्य मिळावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष सय्यद सलीम अब्दुल व उपाध्यक्ष सय्यद अली बशीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
.....................