नागपुरात एटीएम कार्डचे क्लोन करून पैसे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:37 AM2019-02-07T00:37:33+5:302019-02-07T00:38:31+5:30
सायबर गुन्हेगारांनी एटीएम कार्डचे क्लोन तयार करून एका डॉक्टरच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेतले. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील मंजिदाना कॉलनी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी एटीएम कार्डचे क्लोन तयार करून एका डॉक्टरच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेतले. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील मंजिदाना कॉलनी येथे घडली. येथील डॉ. गिरीश कोमल गौतम यांचे एसबीआयमध्ये खाते आहे. अज्ञात आरोपींनी २ फेब्रुवारी रोजी रात्री डॉ. गौतम यांचे एटीएम कार्डचे क्लोन तयार करून त्यांच्या खात्यातून पाटणा (बिहार) येथून ४८ हजार रुपये परस्पर काढून घेतले. अलीकडे सायबर गुन्हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे बँकेने सायबर सुरक्षेसाठी रायपूरमध्ये व्यवस्था तयार केली आहे. डॉ. गौतम यांना बँकेच्या सिस्टममधून फोन आला. त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर डॉ. गौतम यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासणी केली असता एटीएम क्लोन तयार करून पाटणा (बिहार) येथून पैसे काढण्यात आल्याचे उघडकीस आले. अलीकडे एटीएम, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे देण्याचे प्रकार वाढले आहे. सायबर गुन्हेगार स्वॅप मशीनवर एक उपकरण लावतात. यात कार्डची सर्व माहिती त्यात नोंदविली जाते. सायबर गुन्हेगार या मशीनच्या मदतीने बोगस कार्ड तयार करून खात्यांमधून पैसे काढतात. या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बँकाही सक्रिय झाल्या आहेत. यामुळेच डॉ. गौतम यांना लगेच घटनेची माहिती मिळाली.