एटीएममधून रोकड पळवणाऱ्या टोळीचा भंडाफोड; आंतरराज्य टोळीतील तिघांना सिनेस्टाईल अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 03:31 PM2022-09-19T15:31:00+5:302022-09-19T15:32:52+5:30
तहसील पोलिसांची कारवाई
नागपूर :एटीएम मशीनमधील रोकड पळविणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन जणांना तहसील पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या टोळीने तीन वेळा नागपुरात येऊन एटीएममधून २६ वेळा रोकड पळविली आहे. राहुल राजेश सरोज (२४, रा. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), संजयकुमार शंकरलाल पाल (२३, प्रयागराज) आणि अशोक श्रीनाथ पाल (२६,प्रयागराज, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
यापूर्वी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएममधून रोकड पळविण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. तपासादरम्यान आरोपी ट्रॅव्हल्स बसमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते फक्त शनिवार आणि रविवारीच हा गुन्हा करत असत. त्याआधारे पोलिसांनी एटीएमवर पाळत वाढवली. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय साहू, सुनील कुसराम, नाईक संदीप गवळी, वैभव कुरसांगे, कृणाल कोरचे यांना आरोपी एका एटीएममध्ये संशयास्पद स्थितीत दिसले. पोलिसांनी घेराव घालताच एक आरोपी पळून गेला तर तिघे सापडले. त्यांच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर आणि पट्टी जप्त करण्यात आली आहे.
जुने एटीएम करायचे ‘टार्गेट’
आरोपी विशिष्ट कंपनीचेच जुने एटीएम टार्गेट करायचे. जिथे चौकीदार नसतात किंवा जास्त गर्दी नसते, तिथेच ते गुन्हे करायचे. आरोपी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएममध्ये विशिष्ट पट्टी लावायचे. ही पट्टी एटीएमच्या 'कॅश ट्रे'ला कॅश विंडोवजळ येऊ देत नाही. कार्ड टाकून पैसे काढल्याचे आरोपी नाटक करायचे. कॅश ट्रेमध्ये पैसे येताच पट्टी ते जाम करायची. ग्राहक पैसे काढायला गेल्यावर ट्रेमध्येच रोकड अडकायची. कॅश विंडोतून पैसे न आल्याने ग्राहक एटीएम मशीन खराब असल्याचे समजून निघून जायचे. त्यांना पैसे निघाल्याचा संदेशदेखील येत नव्हता. यानंतर आरोपी स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने पट्टी काढायचे व कॅश ट्रेमधून रोख रक्कम घेऊन पोबारा करायचे.