मैदानी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:14+5:302021-07-10T04:07:14+5:30
नागपूर : महानगरपालिका आयुक्तांनी कोरोना निर्बंधांसंदर्भात शुक्रवारी जारी केलेल्या सुधारित आदेशाद्वारे मैदानी खेळांना सकाळ (५ ते ९) व संध्याकाळ ...
नागपूर : महानगरपालिका आयुक्तांनी कोरोना निर्बंधांसंदर्भात शुक्रवारी जारी केलेल्या सुधारित आदेशाद्वारे मैदानी खेळांना सकाळ (५ ते ९) व संध्याकाळ (६ ते ९) या दोन्ही सत्रासाठी परवानगी दिली. त्यामुळे संबंधित खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. परंतु, चार भिंतींच्या आत खेळल्या जाणाऱ्या खेळांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आल्यामुळे संबंधित वर्ग नाराज झाला.
गेल्या आदेशाद्वारे संध्याकाळच्या सत्रात मैदानी खेळ प्रतिबंधित करण्यात आले होते तर, त्यापूर्वीच्या आदेशाद्वारे या खेळांना दोन्ही सत्रात परवानगी देण्यात आली होती. गेल्या आदेशावर संघटक, खेळाडू व प्रशिक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शेवटी प्रशासनाने त्यांना दिलासा दिला.
चार भिंतींच्या आत खेळल्या जाणाऱ्या खेळांना परवानगी मिळण्यासाठी काही बॅडमिंटन प्रशिक्षकांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन सादर केले होते. विभागीय क्रीडा संकुल खुले करण्याची मागणीही केली होती. ते निवेदन मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले होते. यासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची संबंधित वर्गाला आशा होती. परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली.