अवैध धंदेवाल्यांसाठी उपराजधानीतले वातावरण फ्रेण्डली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:38 PM2019-02-14T12:38:07+5:302019-02-14T12:39:52+5:30

सरकारची नोकरी आणि ड्रग्ज माफिया आबूसारख्यांची चाकरी करणाऱ्या गुन्हे शाखेतील गुन्हेगारांच्या एजंटचे पितळ उघडे पडले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कारभाराचीही पोलीस दलात खुली चर्चा सुरू झाली आहे.

atmosphere for illegal business is favorable in Nagpur | अवैध धंदेवाल्यांसाठी उपराजधानीतले वातावरण फ्रेण्डली

अवैध धंदेवाल्यांसाठी उपराजधानीतले वातावरण फ्रेण्डली

Next
ठळक मुद्देकर्तव्यनिष्ठ दडपणात, भ्रष्ट मोकाटपोलीस आयुक्तांच्या उद्देशाला तडा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारची नोकरी आणि ड्रग्ज माफिया आबूसारख्यांची चाकरी करणाऱ्या गुन्हे शाखेतील गुन्हेगारांच्या एजंटचे पितळ उघडे पडले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कारभाराचीही पोलीस दलात खुली चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठांना अंधारात ठेवून त्यांची दिशाभूल करून चापलूस मंडळींनी शहरातून गुन्हे शाखेचा धाकच संपविण्याचा विडा घेतल्यासारखे झाले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेत असलेले अनेक कर्तव्यनिष्ठ पोलीस (अधिकारी, कर्मचारी) दडपणात असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे भ्रष्ट प्रवृत्तीची मंडळी मोकाट सुटल्यासारखी झाली असून, त्यांनी पोलीस आयुक्तांच्या गुन्हेगारीमुक्त शहर, सुरक्षित शहराच्या कल्पनेलाच बासनात गुंडाळले आहे.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय एक सौजन्यशील, अभ्यासू आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळखले जातात. त्यांनी येथील आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारताच नागपूरला गुन्हेगारीमुक्त शहर, सुरक्षित शहर बनविण्याचा संकल्प केला. तो पत्रकारांसमोर बोलून दाखवला आणि तशा पद्धतीने काही योजनाही सुरू केल्या. गुन्हेगारांना धडकी भरविणारे अनेक उपक्रमही सुरू केले. मात्र, गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट मंडळींनी गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना वठणीवर आणण्याऐवजी महिन्याला तगडी देण देणाºयांचे हित जपण्यात स्वारस्य दाखविणे सुरू केले. त्यामुळे मध्य भारतातील सर्वात मोठे हवाला सेंटर असूनही गुन्हे शाखेकडून हवालाची रक्कम पकडली जात नाही. येथे दर आठवड्यात हवालाची कोट्यवधींची खेप येते, हे अनेक पोलिसांना माहीत आहे. जगात कुठेही क्रिकेट मॅच होऊ देत, नागपुरातील बुकी त्यावर कोट्यवधींच्या सट्टा लावतात, खातात. देश-विदेशातील अनेक हायप्रोफाईल सेक्स वर्कर नागपुरात येतात. एका रात्रीत हजारो रुपये घेतात अन् येथून निघून जातात. गुन्हे शाखेत सेक्स रॅकेट चालविणाºया हायप्रोफाईल दलालांच्या मुसक्या बांधण्यासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा पथक आहे. काही दिवसांपासून हे पथक बºयापैकी अ‍ॅक्टिव्ह झाले असले तरी हायप्रोफाईल वारांगना पकडल्यानंतर त्यांच्याकडून काय माहिती मिळाली अन् त्यानंतर पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली, ते कधीच बाहेर येत नाही. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम नव्या दमाचे आणि चांगले अधिकारी आहेत. मात्र, त्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यासाठी भ्रष्ट मंडळी कचरत नसल्याचे वास्तव आहे.
गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. त्यामुळे अवैध धंदेच नष्ट करायची कल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मांडली होती. त्यानुसार, त्यांनी गुन्हे शाखेसह प्रत्येक परिमंडळातील अधिकाºयांना आपापल्या क्षेत्रातील दारू, जुगार, मटका, कुंटणखान्यासह सर्वच प्रकारचे अवैध धंदे हुडकून त्या अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही दिवस सुरळीत चालले, नंतर मात्र जैसे थे सुरू झाले, हे वेगवेगळ्या कारवायातून दिसून येत आहे.

धडाकेबाज कारवाईची अपेक्षा
कोणत्याही ठाण्यापेक्षा कारवाईचा जास्त धाक गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांचा वाटतो. त्यामुळे आधी गुन्हे शाखेतील भ्रष्ट मंडळीशी सेटिंग करण्यावर गुन्हेगारांचा भर असतो. अलीकडे गुन्हे शाखेतील भ्रष्ट मंडळींनी सारे वातावरणच फ्रेण्डली करून सोडले आहे. महिनाभरापूर्वी जुगार किंग कुख्यात अशोक बावाजी आणि नव्वाने हिंगणा-एमआयडीसीत जुगार अड्डा सुरू केल्याची चर्चा होती. आता गेल्या आठवड्यात याच भागात चण्णाने ७० हजारांची देण पक्की करून जुगार अड्डा सुरू केल्याची चर्चा आहे. अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे ठेवणाºयांना वठणीवर आणण्यासाठी भ्रष्ट मंडळींविरुद्ध धडाकेबाज कारवायांची अपेक्षा आहे.

Web Title: atmosphere for illegal business is favorable in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.