तौक्तेने बिघडवले नागपूरचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:06+5:302021-05-18T04:08:06+5:30
नागपूर : अरबी समुद्र ओलांडून पुढे सरकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी नागपूरचे वातावरण दिवसभर बिघडवले होते. ढगाळलेले वातावरण, हवेत वाढलेला ...
नागपूर : अरबी समुद्र ओलांडून पुढे सरकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी नागपूरचे वातावरण दिवसभर बिघडवले होते. ढगाळलेले वातावरण, हवेत वाढलेला प्रचंड दमटपणा आणि उष्णतामान यामुळे नागपूरकर दिवसभर त्रस्त होते.
चक्रीवादळाचा थेट परिणाम नागपुरात जाणवला नसला तरी वातावरणात मात्र चांगलाच बदल झाला. रविवारी सायंकाळी आणि रात्री शहरात काही प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे सोमवारी दिवसभर वातावरण प्रचंड दमट झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर शहरात काही भागात कडक ऊन पडले. यामुळे उकाड्यात चांगलीच भर पडली. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविला होता. यासोबतच, ३० ते ४० किलोमीटर प्रति तासी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, सायंकाळपर्यंत नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात पावसाचे आगमन झालेले नव्हते. १८ मे साठीही हवामान विभागाने असाच अंदाज वर्तविला आहे. सोसाट्याचा वारा किंवा वादळाची सायंकाळपर्यंत नोंद नव्हती.