महिलांवरील अत्याचार वाढले
By admin | Published: March 7, 2017 02:17 AM2017-03-07T02:17:19+5:302017-03-07T02:17:19+5:30
आज २१ व्या शतकातही भारतात महिलांवर प्रचंड अन्याय-अत्याचार होत आहेत. विशेष म्हणजे दलित महिलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे,
अभिनया कांबळे : डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला
नागपूर : आज २१ व्या शतकातही भारतात महिलांवर प्रचंड अन्याय-अत्याचार होत आहेत. विशेष म्हणजे दलित महिलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. डॉ. अभिनया कांबळे यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे डॉ. बबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महिलांच्या उत्थानात डॉ. आंबेडकरांचे योगदान या विषयावर डॉ. कांबळे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे हे उपस्थित होते.
डॉ. कांबळे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उत्थानासाठी अनेक कायदे केलेत. परंतु त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही. कायदे अस्तित्वात असून काहीच उपयोग नाही. तर कायद्यांची थातूरमातूर अंमलबजावणी होण्याऐवजी प्रभावी झाल्यास महिलांचे कल्याण होईल. पण, संविधानाचे वेगळे स्वरूप निर्माण करण्याची खेळी सत्ताधारी करीत आहेत. महिलांचे सर्वच क्षेत्रात वाढणारे प्रमाण अंमलबजावणीत शून्य होत आहे.
हे धक्कादायक चित्र आहे. यावेळी कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषण केले डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले. डॉ. धनराज डहाट यांनी आभार मानले. यावेळी डॉ. यशवंत मनोहर, डॉ. नितीन राऊत, प्रा. रणजित मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)