इंस्टाग्रामवरील मैत्रीतून १७ वर्षीय मुलाचा तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 11:55 AM2022-07-07T11:55:43+5:302022-07-07T12:56:13+5:30
मुलाने नागपुरात येऊन विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नागपूर : इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर उत्तरप्रदेशातील एका अल्पवयीन मुलाने नागपुरातील एमबीए तरुणीवर सहा महिने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने नागपुरात येऊन विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
बुटीबोरी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने एमबीए केले आहे. जून २०२१ मध्ये तिची इंस्टाग्रामवर प्रयागराज, यूपी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाशी मैत्री झाली. अल्पवयीन मुलगा हा बारावीचा विद्यार्थी आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलाने लग्नाच्या बहाण्याने तिला जाळ्यात ओढले. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रयागराजमध्ये मुलीच्या भावाचे लग्न होते. त्यात सहभागी होण्यासाठी ती प्रयागराजला गेली होती. २४ नोव्हेंबर रोजी प्रयागराजहून ट्रॅव्हल्स बसमधून ती नागपूरला येत होती व तिच्यासोबत बसमध्ये अल्पवयीन मुलगादेखील नागपुरात आला. प्रवासादरम्यान त्याने ट्रॅव्हल्स बसमध्येच विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गड्डीगोदाम येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्याने तरुणीला येथे बोलावून परत अत्याचार केला. यानंतर त्याने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून धमकावून तिचे शोषण सुरू केले.
५ जुलै रोजी अल्पवयीन मुलगा मुलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीची चौकशी केली. मुलीने सत्य सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला पकडले व त्याला बुटीबोरी पोलिसांकडे नेले. पोलिसांनी त्याला सीताबर्डी येथे नेण्याचा सल्ला दिला. तेथून सदरमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्याची आई शिक्षिका आहे. कुटुंबात आई आणि एक लहान भाऊ आहे. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पबजीतून जिंकलेल्या पैशांतून महागड्या भेटवस्तू
अल्पवयीन मुलाला पबजी गेम्सचे व्यसन आहे. त्याने त्यात खूप पैसे जिंकले आहेत. या रकमेतून तो विद्यार्थिनीला महागड्या भेटवस्तू द्यायचा. आतापर्यंत दीड लाख रुपयांच्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. यामुळे मुलीने अल्पवयीन मुलगा श्रीमंत कुटुंबातील असल्याचा समज करून घेतला होता.