कुख्यात हाजीच्या नेटवर्कमध्ये शिरली एटीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:09 PM2019-02-05T23:09:43+5:302019-02-05T23:12:04+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया शेख हाजी बाबा शेख सरवर ऊर्फ हाजी याच्या गुन्हेगारीचे नेटवर्क खोदून काढण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) वेगवेगळी पथके चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यात गेली. दरम्यान, ठिकठिकाणच्या कोलमाफियांकडून महिन्याला लाखोंची खंडणी वसूल करण्याच्या वादातून बिनसल्यामुळे हाजीचा कट्टर शत्रू झालेला कुख्यात गुंड शेखू याचा पिस्तूल प्रकरणाशी काही संबंध आहे काय, त्याची मंगळवारी एटीएसच्या पथकाने चौकशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया शेख हाजी बाबा शेख सरवर ऊर्फ हाजी याच्या गुन्हेगारीचे नेटवर्क खोदून काढण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) वेगवेगळी पथके चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यात गेली. दरम्यान, ठिकठिकाणच्या कोलमाफियांकडून महिन्याला लाखोंची खंडणी वसूल करण्याच्या वादातून बिनसल्यामुळे हाजीचा कट्टर शत्रू झालेला कुख्यात गुंड शेखू याचा पिस्तूल प्रकरणाशी काही संबंध आहे काय, त्याची मंगळवारी एटीएसच्या पथकाने चौकशी केली.
बिहारमधून येणाऱ्या बरोनी-सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेसमधून नागपुरात आलेल्या सुपत सिंग (रा. लक्ष्मीपूर, मुंगेर, बिहार) तसेच यवतमाळ (वडगाव) येथील संजय संदीपान खरे या दोघांना एटीएसने २४ जानेवारीच्या रात्री धावत्या रेल्वेतच जेरबंद केले होते. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. चौकशीत या दोघांनी या पिस्तूल आणि जिवंत काडतुसाची खेप चंद्रपूरच्या हाजी याच्यासाठी आणली असल्याचे एटीएसच्या पथकाला सांगितले होते. तेव्हापासून एटीएस हाजीचा शोध घेत होते. तो फरार झाल्याने त्याला पकडण्यासाठी एटीएसने जागोजागी छापेमारी केली होती. तब्बल १० दिवस एटीएसला चकमा देणारा हाजी रविवारी रात्री वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील एका ठिकाणी दडून असल्याची माहिती एटीएसच्या नागपूर पथकाला कळाली. त्यावरून सोमवारी भल्या पहाटे एटीएसचे पथक तेथे पोहचले आणि हाजीचा शोध घेऊन एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. हाजीकडे एटीएसला एक पिस्तूल (कट्टा) सापडले. त्याला नागपुरात आणून एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हाजीला ७ फेब्रुवारीपर्यंत कस्टडी मंजूर केली. तेव्हापासून एटीएसने तपासाला गती दिली आहे. विदर्भातील कुख्यात गुन्हेगारांचा ‘मदतगार’ म्हणून कुपरिचित असलेल्या हाजीसोबत ठिकठिकाणच्या अनेक गुन्हेगारांचे वैरही आहे. त्यातीलच एक नागपुरातील शेखू नामक गुंडही आहे. कधी काळी हाजीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शेखूने चंद्रपूर जिल्ह्यातील कोलमाफियांकडून खंडणी वसूल करून हाजीविरुद्ध मोर्चा उघडल्याने हाजी आणि शेखूत हाडवैर निर्माण झाले. त्यामुळे शागीर्द डोक्यावर बसल्याने कुख्यात हाजी त्याला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहे.
त्यामुळे त्याने या पिस्तूल शेखूचा गेम करण्यासाठी बोलविल्या की आणखी दुसरा कोणता त्याचा हेतू होता, ते माहीत करून घेण्यासाठी एटीएस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करीत आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात शेखूला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एटीएसने त्यासंबंधाने चौकशी चालविली आहे.
घुग्गुस, वणीत धावपळ
हाजीच्या गुन्हेगारीचे नेटवर्क तपासण्यासाठी एटीएसची वेगवेगळी पथके चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तपासासाठी धडकली. हाजीचे घुग्गुस (जि. चंद्रपूर) आणि वणी (जि. यवतमाळ) या भागात मजबूत गुन्हेगारी नेटवर्क आहे. दोन्ही जिल्ह्याच्या पोलिसांना त्याची माहिती आहे. मात्र, हाजीकडून मोठी देण मिळत असल्याने त्या ठिकाणचे पोलीस हाजी किंवा त्याच्या हस्तकांना हात लावण्याची तसदी घेत नाही. एटीएसने हाजीच्या मुसक्या बांधल्याचे कळाल्याने त्याचे अनेक कुख्यात साथीदार गुंड भूमिगत झाले असून, त्यांनी शस्त्रसाठाही लपविल्याची चर्चा आहे. त्यासंबंधाने सोमवारी सकाळपासूनच घुग्गुस आणि वणीत धावपळ सुरू होती. एटीएसने हाजीच्या निवासस्थानी तसेच त्याच्या हस्तकांकडेही छापेमारी केली. एटीएसला त्यात काय मिळाले, त्याची माहिती वृत्त लिहिस्तोवर कळू शकली नाही.