ठग पप्पू पटेलच्या तीन कार्यालयांवर‘ एटीएस’चे छापे; २७.५० लाख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 11:11 IST2023-10-19T11:08:52+5:302023-10-19T11:11:41+5:30
बनावट नोटांविरुद्ध ‘एटीएस’ चे ‘ऑपरेशन’ : कोट्यवधींच्या फसवणूकीत पप्पु पटेल संशयीत

ठग पप्पू पटेलच्या तीन कार्यालयांवर‘ एटीएस’चे छापे; २७.५० लाख जप्त
नागपूर : दोन दिवसात पाच पट अधिक रक्कम परत करण्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या परवेज उर्फ पप्पू पटेल हा बनावट नोटांचे रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून ‘एटीएस’ (दहशतवाद विरोधी पथक) ने बुधवारी हसनबागमध्ये ऑटो डिल कार्यालयासह तीन ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत एटीएसने २७.५० लाख रुपयांसह मोबाईल, लॅपटॉप, डीव्हीआर आणि कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे.
मे महिन्यात नंदनवन पोलिसांनी बालाघाटमधील लांजी येथील रहिवासी आकाश उमरे यांच्या तक्रारीवरून पप्पू पटेल, पराग मोहोड आणि कंचन गोसावीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आकाशला आरोपींनी दोन दिवसात २५ लाखांच्या मोबदल्यात १.२५ कोटी रुपये परत देण्याची बतावणी केली होती. आकाशने आपल्या नातेवाईकाच्या माध्यमातून २ फेब्रुवारीला आरोपींना २५ लाख रुपये दिले होते. दोन दिवसानंतर त्याने पैसे परत मागितल्यावर आरोपींनी त्याला धमकी दिली होती. तीन महिन्यांपर्यंत आरोपींनी टाळाटाळ केल्यामुळे आकाशने नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे प्रकरण बनावट नोटांशी संबंधीत असल्याचा खुलासा ‘लोकमत’ने केला होता. नंदनवन पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला. तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊनही पोलिस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे काही काळातच आरोपींना जामीन मिळाला आणि ते पुन्हा सक्रिय झाले. सुत्रांनुसार एटीएसला पप्पू त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून बनावट नोटा चालवित असल्याची माहिती मिळाली.
मागील काही दिवसांपासून एटीएसच्या वतीने पप्पूच्या हसनबाग येथील ऑटो डील कार्यालयाची निगरानी करण्यात येत होती. बुधवारी सकाळी नऊ वाजता एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त अभय पान्हेकर, निरीक्षक सुनिता मेश्राम, प्रदीप लांडे यांच्या नेतृत्वात ३० जणांच्या पथकाने पप्पूचे कार्यालय, घर आणि त्याचा साथीदार अब्दुल वसीमच्या घरी धाड टाकली. तेथून मोबाईल, लॅपटॉप, डीव्हीआर, कागदपत्रांसह २७.५० लाख रुपये जप्त करण्यात आले. परंतू बँक अधिकाऱ्यांची या नोटा बनावट नसल्याचे सांगितले. एटीएसच्या वतीने मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या डीव्हीआरच्या मदतीने कार्यालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. पप्पू या रॅकेटचा सुत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही काळापर्यंत पप्पुची साधारण परिस्थिती होती. ताजबाग आणि हसनबागमधील संशयीत युवक त्याच्या संपर्कात आहेत. त्याच्या ऑटो डील कार्यालयात पोलिसांचीही नियमित ये-जा होती. मे महिन्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी अंतर ठेवणे सुरु केले. पप्पूचा साथीदार मोहोड पिडितांना एका माजी मंत्र्याचे नाव घेऊन धमकी देत होता.
शेजारील राज्यातही जाळे
या रॅकेटचे जाळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत पसरले होते. तक्रारकर्ता आकाश उमरेसह अनेक नागरिक या रॅकेटचे शिकार झाले आहेत. त्यांनी तक्रारीचा इशारा देताच आरोपी खून करण्याची किंवा बनावट प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन त्यांना शांत करीत होते.
एका कार्यालयातून अनेक गोरखधंदे
एटीएस या रॅकेटशी निगडीत व्यक्तींच्या चल-अचल संपत्ती, मिळकतीच्या साधनांची माहिती गोळा करणार आहे. एकेकाळी नागपूर बनावट नोटांसाठी चर्चेत होते. पोलिसांनी वेळोवेळी पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी आयएसआयतर्फे छापण्यात आलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात बांगलादेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली होती. एटीएसच्या वतीने जप्त केलेल्या नोटा कोणाच्या आहेत, याचा शोध घेत आहे. पप्पू ऑटो डील कार्यालयातून अनेक गोरखधंदे चालवित असल्याची माहिती आहे.