क्रिकेटच्या वादात दोन गटांत हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:42+5:302021-02-07T04:07:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात दोन गट आपसात भिडले. यात तीन जण जखमी झाले. ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात दोन गट आपसात भिडले. यात तीन जण जखमी झाले. ही घटना तहसील पोलीस ठाणे हद्दीतील तकीया येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मो. मेहंदी असद हैदरी (१८, रा. तकिया मेहबुब शाह) याला त्याच्या मावस भावाने गुरुवारी सांगितले की, त्याला आरोपी इनायत अली हा गांधीबाग बगिच्यात क्रिकेट खेळू देत नाही. तेव्हा मेहंदी असद अली रात्री १० वाजता इनायत अली याला समजावण्यासाठी गेला. तिथे आरोपी इनायत अली, इमरान अली, एहसान अली, अजगर अली, कामील अली, जीशान अली आणि सुजान अली यांनी असद अलीवर हल्ला केला. जीशान अलीने काठीने डोक्यावर वार केले. हल्ला झाल्याचे लक्षात येताच असद अलीचे वडील त्याला वाचविण्यासाठी धावले. तेव्हा आरोपींनी असदच्या वडिलांच्या हातावर व भाऊ तकी हैदरच्या पोटावर गुप्तीने वार करून जखमी केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याच प्रकरणात फिर्यादी इमरान अली यानेही तक्रार दाखल केली. त्यानुसार तो वस्तीतून दुचाकीने जात होता. त्या वेळी आरोपी अजहर व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने त्याला रोखले. आणि आमच्याकडे टक लावून का पाहत आहेस, असे म्हणत झापड मारली. तर आरोपी शहबाज व इतरांनी मिळून त्याची दुचाकी व इतर बाइकची तोडफोड केली. त्याच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.