ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:02+5:302020-12-16T04:27:02+5:30
कामठी : माेकाट कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी दगड मारल्याने उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि पाच जणांनी लाठ्या, सब्बल घेऊन ग्रामपंचायतीच्या ...
कामठी : माेकाट कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी दगड मारल्याने उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि पाच जणांनी लाठ्या, सब्बल घेऊन ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर हल्ला चढवला. ही घटना कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथे शनिवारी (दि. १२) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून, मंगळवारी (दि. १५) दुपारी ॲट्राॅसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आराेपी एकाच कुटुंबातील आहेत.
प्रीती मंगेश मानकर असे फिर्यादी ग्रामपंचायत सदस्याचे तर मारोती महादेव ठाकरे (६०), दीनदयाल मारोती ठाकरे (३५), राम मारोती ठाकरे (३६), श्याम मारोती ठाकरे (३१) व अमोल दादाराव सोनेकर (३२) सर्व रा. खैरी, ता. कामठी अशी आराेपींची नावे आहेत. मानकर व ठाकरे कुटुंब शेजारी राहतात. त्यांच्या घरालगत ठाकरे कुटुंबीयांची शेती आहे. प्रीती मानकर यांच्या घरासमाेर माेकाट कुत्री आल्याने त्यांना हाकलून लावण्यासाठी त्यांनी कुत्र्यांच्या दिशेने दगड भिरकावला. याच कारणावरून माराेती ठाकरे याने प्रीती मानकर यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.
हा वाद लगेच विकाेपास गेला आणि माराेतीसह त्याच्या तीन मुले व मुलाच्या मित्राने काठ्या व सब्बल घेऊन प्रीती मानकर यांच्या घरावर हल्ला चढविला. तत्पूर्वी त्यांनी घराचे दार बंद केले. आराेपींनी त्यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करीत त्यांच्या घराची कम्पाऊंड वाॅल ताेडून घराच्या दाराला धक्के दिले. त्यामुळे घाबरलेले मानकर कुटुंबीय घरात लपून बसले हाेते. त्यांनी या घटनेची माहिती लगेच फाेनवरून पाेलिसांना दिली. पाेलीस येत असल्याचे लक्षात येताच पाचही आराेपींनी तिथून पळ काढला. पाेलिसांनी तक्रार नाेंदवून घेत पंचनामा केला. त्यानंतर मंगळवारी दुपारी पाचही आराेपींविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४९, २९४, ४२७,४४७, ५०६ तसेच ॲट्राॅसिटी ॲक्ट १९८९, ३ (१) क्यू, आर, एस, अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रभारी सहायक पाेलीस उपायुक्त एस. कार्यकर्ते, ठाणेदार विजय मालचे यांनी मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली. वृत्त लिहिस्ताे कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.