कृष्णा चित्रपटगृहावर हल्ला
By Admin | Published: March 24, 2017 02:59 AM2017-03-24T02:59:22+5:302017-03-24T02:59:22+5:30
भावना दुखावणारे दृश्य असल्याने त्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी एका विशिष्ट गटाच्या समुदायाने गणेशपेठमधील कृष्णा चित्रपटगृहात हल्ला चढवला.
भावना दुखावल्याचा आरोप : हल्लेखोरांनी केली तोडफोड
नागपूर : भावना दुखावणारे दृश्य असल्याने त्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी एका विशिष्ट गटाच्या समुदायाने गणेशपेठमधील कृष्णा चित्रपटगृहात हल्ला चढवला. आतमधील साहित्याची तोडफोड करून हल्लेखोरांनी व्यवस्थापकाला मारहाण केली. यामुळे गुरुवारी दुपारी गणेशपेठ संत्रा मार्केटजवळच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी या चित्रपटगृहात एक सिनेमा लागणार आहे. तशी जाहिरातबाजी झाल्याने एका विशिष्ट गटाच्या समुदायातील १०० पेक्षा जास्त हल्लेखोरांनी गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास कृष्णा चित्रपटगृहावर धाव घेतली. यावेळी येथे सुरू असलेला सिनेमा बघण्यासाठी (दुपारी १२.३० वाजताचा शो) प्रेक्षक येणे सुरू होते. हल्लेखोरांनी आरडाओरड करीत चित्रपटगृहात प्रवेश केला. आतमधील पडदा (ज्यावर चित्रपट दाखवला जातो) फाडला. खुर्च्या, बाकडे, काचांच्या तावदानाची तोडफोड केली. ही तोडफोड होत असल्याचे पाहून कर्मचारी पळून गेले. व्यवस्थापक सचिन रामटेके यांना मारहाण करून त्यांच्याही कक्षात तोडफोड करण्यात आली. हल्लेखोर सारखी आरडाओरड करीत असल्यामुळे चित्रपटगृहाच्या परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली. माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा पोहोचला. तणाव लक्षात घेता शीघ्र कृती दलाचे जवानही बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी १४ जणांना अटक केली. त्यांच्यावर गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)