वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला
By admin | Published: November 13, 2014 12:56 AM2014-11-13T00:56:22+5:302014-11-13T00:56:22+5:30
दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे चिडलेल्या नागरिकांच्या जमावाने बुधवारी या वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. रात्री ८.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे काही
एका बातमीच्या विरोधात केली तोडफोड
नागपूर : दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे चिडलेल्या नागरिकांच्या जमावाने बुधवारी या वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. रात्री ८.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त हल्लेखोरांनी पोलिसांनाही मारहाण केली. हल्ला करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी घटनास्थळीच पकडले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी दैनिक भास्कर या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीच्या विरोधात रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास जरीपटका मार्टीननगर येथील २० ते २५ लोकांचा जमाव वृत्तपत्र समूहाच्या ग्रेट नाग रोड येथील कार्यालयावर धडकला. ते नारेबाजी करीत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. कार्यालयाच्या मुख्य दारावर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवित दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दगडफेक करीत दरवाजा उघडला. काही हल्लेखोर सुरक्षा भिंतीवरून उडी घेऊन आत आले. हल्लेखोरांनी सर्वात अगोदर कार्यालयासमोर असलेल्या वाहनांना आपले लक्ष्य बनविले. तीन कार आणि एक डझनभर दुचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर हल्लेखोर तळ मजल्यावर आले. तिथेही तोडफोड केली. तेथून पहिल्या माळ्यावर आले. तिथे उपस्थित पत्रकार व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. उग्र रूप पाहून कार्यालयात उपस्थित काही कर्मचाऱ्यांंनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. यात पत्रकारांचे मोबाईल आणि इतर वस्तूंचीही तोडफोड केली. यात सात-आठ कर्मचारी जखमी झाले. पहिल्या माळ्यावर तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर दुसऱ्या माळ्यावर आले. तिथेही तोडफोड केली. इमामवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच हल्लेखोर पळू लागले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे आणखीनच संतप्त झालेले हल्लेखोर पोलिसांना मारहाण करू लागले. पोलिसांनी बळाचा वापर करून पाच जणांना पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त के.के. पाठक, संयुक्त पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टने या हल्ल्याचा निषेध केला आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)