माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:02 AM2024-11-19T05:02:59+5:302024-11-19T05:04:59+5:30
Anil Deshmukh News: एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला.
काटोल (जि. नागपूर) : राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.
नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले.
एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
जखमेच्या जागेवर सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. देशमुख यांचा रक्तदाबही वाढला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
काटोल ग्रामीण रुग्णालयाबाहेर शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काटोल पोलिसांचा ताफाही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.
#BREAKING 🚨 | Former Home Minister Anil Deshmukh was injured in a stone-pelting attack on Katol-Jalalkheda Road after a rally. His vehicle was damaged, and he received emergency treatment.#AnilDeshmukh#AttackonAnilDeshmukh#Katoljalalkhedaroad#attackpic.twitter.com/5WxQrMxGU0
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) November 18, 2024
लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत
"अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणे किंवा हल्ला करणे, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथे ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले", शरद पवार यांनी म्हटले आहे.