पोलीस हवलदारावर प्राणघातक हल्ला : आरोपी निघाला पोलिसाचा मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:13 PM2019-09-27T23:13:14+5:302019-09-27T23:14:01+5:30
पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. तर, दोघे सिक्युरिटी गार्ड आहेत. पोलीस लाईनमध्ये दिसलेल्या अनोळखी व्यक्तींना हटकले म्हणून त्यांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदाराचे नाव अनिल चक्रे आहे. ते पोलीस मुख्यालयात सेवारत असून, सध्या रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती आहेत. पोलीस लाईन टाकळीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस लाईन टाकळीमध्ये राहणारे अनिल चक्रे हे २० सप्टेंबरला रात्री पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धनराज राठोड यांच्या घराजवळ बसून गप्पा करीत बसले. रात्री ८.३० च्या सुमारास चक्रे मेजर तेथून घराकडे जात असताना त्यांना दोन तरुण गप्पा करताना बसून दिसले. चक्रे मेजर यांनी त्यांना हटकले. तुम्ही कोण आहात, कशाला इकडे आले, अशी विचारणा केल्यामुळे आरोपींनी चक्रे मेजरसोबत वाद घातला. त्यांनी चक्रे मेजरच्या अंगावर स्प्लेंडर मोटरसायकल नेऊन त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील चक्रे मेजर यांना डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करून डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविले.
पोलीस लाईनमध्ये पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली. हल्ला करणारे गुंड कोण असतील, असा प्रश्न निर्माण झाला होता. तर, पोलीस लाईनमध्ये येऊन पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांशी किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित असावा, असा संशय होता. या पार्श्वभूमीवर, चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला. खबऱ्याने हा हल्ला मानकापूर ठाण्यातील हवालदार युवराज सावरकर यांचा मुलगा स्वप्निल आणि त्याच्या साथीदाराने केल्याचे सांगितले. त्यावरून आज त्याला अटक करण्यात आली. संशयित साथीदाराची चौकशी सुरू आहे.