-तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील
By admin | Published: September 18, 2016 02:32 AM2016-09-18T02:32:55+5:302016-09-18T02:32:55+5:30
पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो.
नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी पोलिसांनाही समुपदेशनाची गरज आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांचे मत
नागपूर : पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो. अशा या पोलिसांवरच हल्ले होत असेल आणि ते दुबळे बनत असतील तर ते समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे गुन्हेगारांची, समाजकंटकांची, भीती संपेल. पोलिसांना सक्षम बनविण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. पोलिसांवरील हल्ल्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, पोलिसांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईच करायला हवी, असा सल्ला आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला.
पोलिसांबद्दलची भीतीच संपली
अत्याचाराची, एखाद्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीची मदत करण्याची तत्परता पोलीस दाखवत नाही. त्याला ते हेलपाटे घालवायला लावतात. त्यामुळे पोलिसांबद्दल आपुलकी तर राहतच नाही. उलट काहीसा राग निर्माण होतो. दुसरे म्हणजे, पूर्वीचे पोलीस सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती अन् आदर राहायचा. अलीकडे पोलीस ठाण्यापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी बऱ्याच प्रकरणात कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीतीच संपली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुजोरी करणे, अंगावर धावून जाणे आदी प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.
- बाबासाहेब कंगाले, निवृत्त सहपोलीस आयुक्त
नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्या
गुन्हेगारी संपली पाहिजे, अवैध धंदेही नको अन् वाहतूकही सुरळीत हवी. मात्र, हे करतानाच आम्ही आमची जबाबदारी मात्र दुर्लक्षित करायची. सिग्नल तोडायचा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करायचे आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्यावर हल्ला करायचा, हा प्रकारच समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची लाचखोरी या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे खरे असले तरी तडजोडीच्या नावाखाली आम्हीच त्यांना लाच देण्यास तयार असतो. पोलिसांनी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास हल्ले होणार नाही. त्यासाठी पोलिसांचे समुपदेशन होण्याची गरज आहे.
- रमेश मेहता, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी.
वाद घालणे टाळा
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासोबत वाद घालू नका, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. नंतर संबंधितांनी खोट्या तक्रारी किंवा आरोप करू नये म्हणून शक्यतो कारवाईच्या वेळी मोबाईलवर शूटींग करण्याचा सल्लाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.
- स्मार्तना पाटील,
वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त