महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर सव्वा महिन्यानंतर अंमल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:08 PM2019-06-13T23:08:54+5:302019-06-13T23:12:47+5:30
महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२३ एप्रिल रोजी खरबी रोड येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक गेले होते. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियाने अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. वाळू माफियाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. तसेच सर्व अवैध ट्रकही पळवून लावले. नंदनवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अनेक तास बसवून ठेवल्याची माहिती आहे. तसेच तक्रारीत नमूद असताना अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केल्याचे कलमच लावले नाही. फक्त आयपीसीचे कलम ३५३ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचे अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांशी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्रव्यवहार केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नंदनवन पोलिसांना पाठविले. नंदनवन पोलिसांना १५ दिवसानंतर म्हणजे १८ मे रोजी मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करण्याच्या उद्देशाने आवश्यक बयाण नोंदविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र मतमोजणीचे कारण पुढे करीत कर्मचारी गेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर जवळपास सव्वा महिन्याने नंदनवन पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली.
बयाण न घेताच कलमात वाढ
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर तक्रार अधिकारी नायब तहसीलदार सुनील साळवे यांना बयाण नोंदविण्यासाठी नंदनवन पोलिसांनी बोलावले होते. मात्र मतमोजणी असल्याने ते गेले नाही. बयाणच नव्याने नोंदविण्यात आले नसल्याने साळवे यांनी सांगितले. असे असताना पोलिसांनी आयपीसीच्या ३०७, १२० (ब),१५२,५०४,५०६,१०९ व माईन्स अॅण्ड मिनरल अॅक्ट १९५७ चे कलम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बयाण न घेताच गुन्ह्यात वाढ केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.