चारित्र्यावर संशय, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा
By Admin | Published: November 4, 2016 02:23 AM2016-11-04T02:23:13+5:302016-11-04T02:23:13+5:30
भारतामध्ये विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानले जाते.
हायकोर्टाचे मत : भारतात विवाहाला मानतात पवित्र बंधन
राकेश घानोडे नागपूर
भारतामध्ये विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानले जाते. ही मूल्ये जपणाऱ्या समाजातील विवाहित महिलेच्या चारित्र्यावर कोणी वारंवार संशय घेत असेल तर ही कृती आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा ठरते, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.
प्रकरणातील पती दारूच्या नशेमध्ये पत्नीला नेहमीच मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे पत्नीने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. कायद्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विवाहित महिलेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेणे या स्पष्टीकरणांतर्गत मोडते. विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानणाऱ्या समाजातील कोणतीही महिला असे मानहानीजनक आरोप सहन करू शकत नाही. विवाहानंतर महिलेसाठी माहेरची दारे बंद झालेली असतात. अशा वेळी पतीही निर्दयतेने व क्रूरतेने वागत असल्यास महिलेला खोल डोहात बुडाल्यासारखे वाटते. या परिस्थितीत ती दु:ख आणि मानहानीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी जीवन संपविण्याचा मार्ग निवडते, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला आहे.
असे आहे प्रकरण
नरेश केशव गाणार (३४) असे आरोपीचे नाव असून, तो शेकापूर (बाई), ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. मृताचे नाव ज्योती होते. २००९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. नरेशला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता.
४ एप्रिल २०१४ रोजी आरोपीने याच वागणुकीची पुनरावृत्ती केली. रोजची मानहानी असह्य झाल्यामुळे ज्योतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.
आरोपीने तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले होते. पण काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. दोनपैकी एका मृत्युपूर्व बयानात तिने आरोपीच्या क्रूरतापूर्ण वागणुकीची माहिती दिली होती.
सत्र न्यायालयातील शिक्षा
२८ आॅगस्ट २०१५ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४९८-अ (विवाहितेचा छळ) अंतर्गत दोन वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
हायकोर्टात
दोष कायम
उच्च न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त करणे व विवाहितेचा छळ हे आरोपीवरील दोन्ही दोष कायम ठेवले. आरोपी वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे क्रूरता आहे. परिणामी सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही असे उच्च न्यायालयाने आरोपीवरील दोष कायम ठेवताना स्पष्ट केले.
मुलामुळे कारावासात दया
उच्च न्यायालयाने आरोपीच्या मुलामुळे कारावासाच्या शिक्षेत दया दाखवली. आरोपी एप्रिल-२०१४ पासून कारागृहात आहे. यापूर्वी त्याने कोणताही गुन्हा केला नव्हता. आरोपीला अटक झाली तेव्हा त्याचा मुलगा ५ वर्षे वयाचा होता. आरोपी कारागृहात असल्यामुळे मुलाचे शिक्षण व विकासाची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाऊ शकली नाही. यामुळे कारावासाच्या बाबतीत आरोपीला दया दाखविण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मंजूर करून आरोपीने आतापर्यंत भोगली तेवढीच शिक्षा पुरेशी ठरवली व त्याला कारागृहातून मुक्त करण्याचे निर्देश दिलेत. दंड व अन्य शिक्षा कायम ठेवण्यात आली.