पोलिसांवरील हल्ले वाढले
By Admin | Published: December 30, 2016 02:26 AM2016-12-30T02:26:51+5:302016-12-30T02:26:51+5:30
कर्तव्य बजावताना पोलिसांवर हल्ले करण्याच्या प्रवृत्तीत नागपुरात वाढ होत असून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याने
ठोस प्रतिबंधात्मक उपायच नसल्याने गुन्हेगारांची वाढली हिंमत : सीआयडी अहवालातील माहिती
राहुल अवसरे नागपूर
कर्तव्य बजावताना पोलिसांवर हल्ले करण्याच्या प्रवृत्तीत नागपुरात वाढ होत असून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याने हल्लेखोरांची हिंमतही वाढलेली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्या संकेत स्थळावर २०१५ च्या गुन्हेगारीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ही बाब आढळून आली आहे.
कर्तव्य बजावताना ६४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५९ जण अपघातात तर ५ जण गुन्हेगारांच्या हल्ल्यात मरण पावले. त्यापैकी सर्वाधिक ११ जण चंद्रपूर जिल्ह्यात, ९ जण गडचिरोली, ५ जण ठाणे ग्रामीण आणि ४ जण नागपूर शहरात मरण पावले. गत वर्षी २०१४ मध्ये राज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या ६४ जणांमध्ये ३० पोलीस शिपाई, २० पोलीस हेड कॉन्स्टेबल, ११ सहायक फौजदार, २ पोलीस उपनिरीक्षक आणि एका राजपत्रित अधिकाऱ्याचा समावेश होता.
राज्यात एकूण ९ पोलीस आयुक्तालय असून आयुक्तालयाच्या क्षेत्रात ११ जणांचा मृत्यू आणि ८८ जण जखमी झाले. २०१५ मध्ये राज्यात ३७० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून २०१४ मध्ये २८५ कर्मचारी जखमी झाले होते. त्यापैकी सर्वात जास्त ८१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे गडचिरोली, ६० नाशिक ग्रामीण, ४२ मुंबई शहर, १८ प्रत्येकी नागपूर ग्रामीण आणि नंदूरबार येथील आणि १७ सांगली येथील आहेत. मृत झालेल्या ३० कॉन्स्टेबलमध्ये २ दहशतवादी कारवाईत, २ गुन्हेगारांकडून ठार झाले तर २६ जण अपघातात मरण पावले. याशिवाय सर्व २० हेड कॉन्स्टेबल हे अपघातात, ११ सहायक फौजदारांपैकी १० जण अपघातात आणि एक जण गुन्हेगाराच्या हल्ल्यात ठार झाला. अपघातातच २ उपनिरीक्षक आणि १ निरीक्षक, अशा तिघांचा मृत्यू झाला.
या जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी, ४४.५ टक्के बेकायदेशीर जमावाने केलेल्या हल्ल्यात २७.५७ टक्के अपघातात, ९.१८ टक्के गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात आणि १.३५ टक्के जण दरोडा प्रतिबंधक आणि इतर धाडीत जखमी झाले आहेत.
या एकूण जखमींमध्ये २१३ पोलीस शिपाई, ८८ पोलीस हेड कॉन्स्टेबल, १६ सहायक फौजदार, ३४ पोलीस उपनिरीक्षक, १२ पोलीस निरीक्षक आणि ७ राजपत्रित दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिपायांपैकी ५० दहशतवादी कारवायात, २ दरोडेखोरांच्या हल्ल्यात, ७८ दंगलीत, २२ गुन्हेगारांच्या हल्ल्यात आणि ६१ अपघातात जखमी झाले. पोलीस हेड कॉन्स्टेबल पैकी २ दहशतवादी कारवायात, १ दरोडेखोराच्या हल्ल्यात, ५१ दंगलीत, ५ गुन्हेगारांच्या हल्ल्यात आणि २९ अपघातात जखमी झाले. सहायक फौजदारांपैकी १ दहशतवादी कारवायात, ९ दंगलीत, २ गुन्हेगारांच्या हल्ल्यात आणि ४ जण अपघातात जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षकांपैकी ११ दहशतवादी कारवायात, २ दरोडेखोरांच्या हल्ल्यात, १२ दंगलीत, ४ गुन्हेगारांच्या हल्ल्यात आणि ५ अपघातात जखमी झाले. पोलीस निरीक्षकांमध्ये ८ दंगलीत, १ गुन्हेगाराच्या हल्ल्यात आणि ३ अपघातात जखमी झाले. राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये २ दहशतवादी कारवायात आणि ५ दंगलीत जखमी झाले.
सहायक फौजदार वकिलाचा बळी
उपराजधानीत चालू वर्षी २३ आॅक्टोबर २०१६ रोजी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार पुरुषोत्तम आष्टनकर यांचा रामदासपेठ येथील वकील अॅड. सौमित्र सुभाष पालीवाल यांच्या भरधाव इकोस्पोर्ट कारने धडक देऊन बळी घेतला. कर्तव्य आटोपून आष्टनकर आपल्या होंडा पॅशन मोटरसायकलने गोपालनगर येथील घराकडे परतत असताना रहाटे कॉलनी चौकात ही दुर्दैवी घटना घडली होती.
मै डॉन हू म्हणत केला होता हल्ला
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानेवाडा चौकाच्या वळणावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस कर्मचारी राहुल अरुणराव खळतकर आणि रामचंद्र नानाजी रोहणकर यांच्यावर अंबानगर मानेवाडा येथील हार्डवेअर व्यापारी गुणवंत वामनराव तुमसरे याने ‘ मै एरिया का डॉन हू’ म्हणत आपल्या साथीदारांच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना २० आॅक्टोबर रोजी घडली होती. सध्या तुमसरे जामिनावर असून त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू असून ती मोठ्या राजकीय दबावातून दडपल्या जाण्याची शक्यता आहे. ड्रंकन ड्राईव्हदरम्यान आणखी एका वाहतूक पोलीस शिपायावर हल्ल्याची घटना संत्रामार्केट भागात घडली होती. मुंबईच्या धर्तीवर पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत कारवाई होत नसल्याने हल्लेखोरांची हिंमत वाढत असल्याचे बोलले जात आहे.