अट्टल ट्रॅक्टर चाेरटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:33+5:302021-08-01T04:08:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : शेतातून ट्राॅलीसह ट्रॅक्टर चाेरून नेणाऱ्या अट्टल चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या २४ तासांच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : शेतातून ट्राॅलीसह ट्रॅक्टर चाेरून नेणाऱ्या अट्टल चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या २४ तासांच्या आत मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ट्रॅक्टरवर ट्राॅली असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. चाेरीची ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी शिवारात घडली हाेती.
संताेष अनंतराम साेनवणे (रा. बडपाणी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. जनार्दन व्यंकटरराव मदीपाटी (रा. डुमरी, ता. पारशिवनी) यांच्याकडे एमएच-४०/बीई-५००८ क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि एमएच-३१/जी-९६१९ क्रमांकाची ट्राॅली आहे. अज्ञात चाेरट्याने हा ट्रॅक्टर ट्राॅलीसह चाेरून नेल्याने त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. कन्हान पाेलिसांसाेबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपासाला सुरुवात केली.
दरम्यान, संताेष त्याच्या बडपाणी येथील शेतात याच क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कामे करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली हाेती. त्यामुळे पथकाने लगेच बडपाणी गाठून संताेषला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ६० हजार रुपयांची ट्राॅली असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. त्याच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे व साहेबराव बहाळे, हवालदार विनाेद काळे, शैलेश यादव, अरविंद भगत, शिपाई सत्यशील काेठारे, वीरेंद्र नरड, प्रणय बनाफर, वीरेंद्र यादव, सुधीर चव्हाण यांच्या पथकाने केली.