नागपुरात तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:33 AM2018-05-30T00:33:22+5:302018-05-30T00:33:40+5:30
दारूच्या नशेत टुन्न असलेले मित्रच एका तरुणाच्या जीवावर उठले. त्यांनी सुमेध हेमराज तिरपुडे (वय २७) याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेला सुमेध जगण्यामरण्याचा संघर्ष करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेले मित्रच एका तरुणाच्या जीवावर उठले. त्यांनी सुमेध हेमराज तिरपुडे (वय २७) याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेला सुमेध जगण्यामरण्याचा संघर्ष करीत आहे.
म्हाडा वसाहत, बसथांब्याजवळ राहणारा सुमेध इंदोरा चौकात बुक आणि वर्तमानपत्राचा स्टॉल चालवितो. आरोपी राजेंद्रसिंग सुखदेवसिंग भाटिया (वय २७, रा. बाबादीपसिंगनगर) याच्यासोबत त्याची मैत्री होती. सोमवारी सायंकाळी सुमेधने भाटियाची बुलेट चालवायला घेतली तर भाटियाने रमजू नामक आरोपीची स्प्लेंडर चालवायला घेतली. ते फेरफटका मारत असताना स्प्लेंडरमधील पेट्रोल संपले. त्यामुळे आरोपी भाटिया, रमजू आणि त्यांच्या एका मित्राने कामगारनगरातील पंपावर जाऊन बाटलीत पेट्रोल आणले. येताना त्यांच्यात काय कट झाला, कळायला मार्ग नाही. आरोपींनी बाटलीतील पेट्रोल स्प्लेंडरमध्ये टाकण्याऐवजी सुमेधच्या अंगावर ओतले. त्यानंतर आरोपी भाटियाने माचिसची काडी उगाळून सुमेधला पेटविण्याचा प्रयत्न केला. सुमेधने ती काडी कशीबशी विझविली. तेवढ्या वेळेत आरोपीने अन्य दोघांना इशारा केला. त्यामुळे तिसऱ्या आरोपीने माचिसची काडी उगाळून सुमेधच्या अंगावर फेकली. पाहता पाहता सुमेधच्या सर्वांगाने पेट घेतला. तो वेदनांनी आक्रोश करीत असताना आरोपी पळून गेले. आजूबाजूच्यांनी त्याला कसेबसे विझविले. त्याला मेयोत दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती जरीपटका ठाण्यात कळविण्यात आली. पीएसआय टेमगिरेंनी गंभीर अवस्थेतील सुमेधचे बयान नोंदविले. त्यावरून आरोपी भाटिया, रमजू आणि अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
एवढ्या गंभीर प्रकरणात जरीपटका पोलिसांनी थंड भूमिका स्वीकारली आहे. २४ तास होऊनही त्यांनी या प्रकरणाचे कारण आणि आरोपींचे नाव सांगण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. पीएसआय टेमगिरेंनी या प्रकरणात दोघांना अटक केली, मात्र नाव आठवत नसल्याचे म्हटले. हा तपास आता पीएसआय डाकेंकडे गेल्याचे ते म्हणाले. डाकेंशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे आरोपी भाटियाचे काही साथीदार सोमवारी सायंकाळपासूनच जरीपटका ठाण्यातील ‘सेटर’सोबत संपर्कात असल्याची चर्चा आहे. एकूणच घटनाक्रमामुळे या प्रकरणात जरीपटका पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.