बँकेला तीन कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:14 PM2020-07-28T21:14:55+5:302020-07-28T21:23:21+5:30
बनावट चेक तयार करून त्याआधारे स्टेट बँकेच्या मेडिकल चौकातील शाखेला तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा पाच आरोपींनी प्रयत्न केला. हा चेक बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे आरोपींचा प्रयत्न फसला आणि पाचपैकी तिघांना पोलीस कोठडीत जावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट चेक तयार करून त्याआधारे स्टेट बँकेच्या मेडिकल चौकातील शाखेला तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा पाच आरोपींनी प्रयत्न केला. हा चेक बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे आरोपींचा प्रयत्न फसला आणि पाचपैकी तिघांना पोलीस कोठडीत जावे लागले. दोघे फरार आहेत. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.
आरोपी पंकज नथुजी भोंगाडे, निखिल दिलीपराव बनसिंगे आणि सादिक चिमथानवाला हे तिघे स्टेट बँकेच्या मेडिकल चौक शाखेत सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास आले. त्यांनी बँकेच्या काऊंटरवर एक चेक दिला. दोन कोटी, ९७ लाख, ५० हजार रुपयाचा हा चेक लिपिकाने व्यवस्थापकांकडे पाठविला. एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पाहून बँक व्यवस्थापकाला संशय आला. त्यांनी आरोपींना चेक देणाऱ्याबाबत विचारपूस केली. ते गोंधळले. त्यामुळे बँक व्यवस्थापकाचा संशय बळावला. त्यांनी संबंधित क्रमांकाच्या चेकची शहानिशा केली असता तो बनावट असल्याचे आणि काही दिवसांपूर्वीच या क्रमांकाचा चेक बँकेतून वटविण्यात आल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी इमामवाडा पोलिसांना कळविले. ठाणेदार मुकुंद साळुंखे आपल्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले. त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर चेक घेऊन येणारे पंकज भोंगाडे, निखिल बनसिंगे आणि सादिक चिमथानवाला या तिघांना ताब्यात घेतले. हा चेक तयार करून वटविण्याच्या गुन्ह्यात आरोपी केशव पावनकर आणि सोनू सावरकर हे फरार झाले. पोलिसांनी उपरोक्त तिघांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
...आणि बिंग फुटले!
आरोपी पंकज भोंगाडे हा स्टेट बँक शाखा मेडिकल चौकचा खातेधारक आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा चेक घेऊन आल्यानंतर बँक अधिकाºयांनी त्याचे खाते तपासले असता त्याच्या खात्यात केवळ २४१ रुपये असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मोठ्या रकमेचे अथवा नियमित व्यवहार या खात्यातून होत नसल्याचेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याचमुळे त्यांनी हा चेक कुठून आणला, कुणी दिला, कशाबद्दल दिला, अशी भोंगाडेकडे विचारणा केली आणि त्यातूनच त्याचे बिंग फुटले.