नागपुरात गुंडाकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:11 AM2020-12-19T00:11:55+5:302020-12-19T00:13:06+5:30
Attempt to create racial rift गिट्टीखदानमधील एका कुख्यात गुन्हेगाराने सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदानमधील एका कुख्यात गुन्हेगाराने सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शहरातील गिट्टीखदान आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळ गाठून आरोपी अरबाजवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत जमावाला शांत केले. हा गुंड गिट्टीखदानमध्ये राहतो. कुख्यात शेखू गँगचा सदस्य आहे. तो शस्त्र तस्करी, एमडी, रेती तस्करी आणि जनावरांच्या तस्करीतही सहभागी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूचीही तो तस्करी करतो. खंडणी वसुली आणि जमिनी बळकवण्यातही तो आणि त्याचे साथीदार सक्रिय आहेत. या गुंडाने शुक्रवारी दुपारी स्वत:चा एक अत्यंत अश्लील भाषेतील आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यात त्याची भाषा जातीय तेढ निर्माण करणारी असल्याने अनेक सामाजिक संघटना आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते संतप्त झाले. करनी सेनेचे अध्यक्ष पंजू तोतवाणी तसेच कुणाल यादव आपल्या सहकाऱ्यांसह गिट्टीखदान ठाण्यात धडकले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पोलिसांकडे नोंदवली. नंतर विविध सामाजिक संघटना तसेच पक्षाचे कार्यकर्ते गिट्टीखदान ठाण्यात तसेच आरोपीच्या घराकडे पोहचले. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सदर ठाण्यात आणले. ते कळताच मोठा जमाव सदर पोलीस ठाण्याकडे धावला. स्थिती हाताबाहेर जाण्याचे संकेत मिळाल्याने मोठा पोलीस ताफा आरोपीच्या घराजवळ, गिट्टीखदान तसेच सदर पोलीस ठाण्यासमोर लावण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमारही स्वत: सदर ठाण्यात पोहचले. त्यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जमावाला शांत केले. त्यानंतर परिस्थिती निवळली.
मोठा अनर्थ टळला
जमावाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. मात्र, पोलिसांनीही अत्यंत काैशल्याने परिस्थिती हाताळली. आरोपीच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात संतप्त जमाव पोहचला. काहींनी दगडफेक करून त्याची कार फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जमावाला पद्धतशीर हाताळून मोठा अनर्थ टाळला.