तरुणीची छेड काढणाऱ्याला कारने चिरडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 08:01 PM2021-04-29T20:01:22+5:302021-04-29T20:02:36+5:30
Attempt to crush man with a car भावी पत्नीची छेड काढणाऱ्या एका कुख्यात गुंडाला कारने चिरडून ठार मारण्याचा चौघांनी प्रयत्न केला. आरोपींचा अंदाज चुकल्यामुळे तो गुंड बचावला. मात्र त्याच्या हाता-पायाला जबर दुखापत झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावी पत्नीची छेड काढणाऱ्या एका कुख्यात गुंडाला कारने चिरडून ठार मारण्याचा चौघांनी प्रयत्न केला. आरोपींचा अंदाज चुकल्यामुळे तो गुंड बचावला. मात्र त्याच्या हाता-पायाला जबर दुखापत झाली. जुगनू ज्ञानेश्वर वानखेडे (वय ३०) असे जखमी झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगरात राहतो.
जुगनू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल आटोडे, संकेत पोरंडवार, रोशन राऊत आणि बॉबी डॅनियल अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. जुगनू आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. निखिलचे काही दिवसांपूर्वीच एका तरुणीशी लग्न जुळले. आरोपी जुगनूने तिची छेड काढल्यामुळे आठ-दहा दिवसांपासून त्यांच्यात वैर निर्माण झाले. जुगनू गुंड वृत्तीचा असल्याने तो आरोपींना नेहमी धमकावत होता. पैशाचीही मागणी करायचा. त्यावरून तीन दिवसांपूर्वी यांचा मोठा वाद झाला. या वेळी जुगनू तसेच आरोपींनी एकमेकांच्या दुचाक्या फोडल्या. जुगनू क्रूर वृत्तीचा असल्यामुळे तो आपला गेम करेल, अशी आरोपींना भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा कट केला. त्यानुसार ते त्याला मारण्याची संधी शोधू लागले. बुधवारी रात्री ९ वाजता जुगनू त्याचा जरीपटक्यातील मित्र राहुल शेंगळे याला भेटण्यासाठी दुचाकीने जात होता. ही संधी साधून आरोपी निखिल, संकेत, रोशन आणि बॉबी या चौघांनी स्विफ्ट डिझायर कारने त्याचा पाठलाग सुरू केला आणि सदरमधील सेंट जोसेफ शाळेसमोर त्याच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. खाली पडल्याने जुगनूच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी पळून गेले. आरोपींनी ठार मारण्याच्या उद्देशाने कारची धडक मारली, असे जुगनू याने सदर पोलीस ठाण्यातील तक्रारीत नमूद केले. ठाणेदार संतोष बाकल यांनी या प्रकरणात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आणि चारही आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.