राजभवनात घुसण्याचा प्रयत्न ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:08 AM2021-01-17T04:08:22+5:302021-01-17T04:08:22+5:30
नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नागपुरातील राजभवनाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने शनिवारी मोर्चा काढला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे ...
नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नागपुरातील राजभवनाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने शनिवारी मोर्चा काढला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू असताना शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी राजेंद्र मुळक, आ. अभिजित वंजारी यांनी कार्यकर्त्यांसह राजभवनच्या पश्चिम गेटच्या दिशेने धाव घेतली व राजभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सशस्त्र पोलीस दलाने त्यांना वेळीच रोखून धरले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनात उपस्थित असताना काँग्रेसकड़ून घेराव आंदोलन होणार होते. त्यामुळे शेकडो पोलिसांनी राजभवनला चौफेर वेढा घालत तटबंदी उभारली होती. राजभवनाकडे येणारे सर्व रस्ते सकाळीच बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले बरेच ट्रॅक्टर आधीच अडविण्यात आले. ते आंदोलनस्थळी पोहचलेच नाही. कार्यकर्ते फोन करून नेत्यांना याची माहिती देत होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
काँग्रेसजनांमध्ये उत्साह, दिल्ली आंदोलनाची अनुभूती
- आंदोलनासाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. आंदोलनासाठी जमलेली गर्दी पाहून काँग्रेस नेते सुखावले तर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. आंदोलनात आलेले शेकडो ट्रॅक्टर, शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ होत असलेली नारेबाजी यामुळे जणूकाही आपण दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातच सहभागी झालो आहोत, अशी अनुभूती कार्यकर्ते घेत होते.