बाेगस कागदपत्रांद्वारे दुकान हडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:00+5:302021-08-21T04:13:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : किरायेदाराने दुकानाची बाेगस कागदपत्रे तयार केली व त्यावर मूळ दुकानमालकाची खाेटी स्वाक्षरी करून दुकानाची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : किरायेदाराने दुकानाची बाेगस कागदपत्रे तयार केली व त्यावर मूळ दुकानमालकाची खाेटी स्वाक्षरी करून दुकानाची परस्पर विक्री करीत ते हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार कामठी शहरात नुकताच घडला असून, पाेलिसांनी किरायेदाराविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
रवी जांगडे (४८, रा. बजरंग पार्क, कामठी) यांचे कामठी शहरातील शुक्रवारी बाजार परिसरात मुख्य मार्गावर दुकान आहे. त्यांने ते दुकान सुप्रियान रामास्वामी (४५, रा. मोहननगर, नागपूर) याला किरायाने दिले आहे. त्यासाठी रवी जांगडे यांनी २१ फेब्रुवारी २०१९ राेजी या दुकानाचा भाडे करारनामा केला हाेता. मध्यंतरी सुप्रियान रामास्वामी याने ५०० रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर रवी जांगडे यांची खाेटी स्वाक्षरी केली आणि त्या स्टॅम्प पेपरच्या आधारे दुकानाचे नाेटरी कागदपत्र तयार केले.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुप्रियान रामास्वामी याने रवी जांगडे यांना दुकानाचा मासिक किराया देण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर त्याने दुकान आपल्या मालकीचे असल्याचीही बतावणी केली. त्यामुळे रवी जांगडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. सुप्रियान रामास्वामी याने रवी जांगडे यांची खाेटी स्वाक्षरी करून दुकानाचे बाेगस कागदपत्र तयार केल्याचे पाेलीस तपासात उघड झाले. परिणामी, कामठी (जुनी) पाेलिसांनी सुप्रियान रामास्वामी याच्याविराेधात भादंवि ४२०, ४६७, ४६८ ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. मदनकर करीत आहेत.