नागपुरात हल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:23 PM2018-07-03T21:23:03+5:302018-07-03T23:03:22+5:30

मध्य भारतातील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर नागपुरातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Attempt to kidnap Haldiram owner in Nagpur | नागपुरात हल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

नागपुरात हल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देथोडक्यात बचावले५० लाखांच्या खंडणीची मागणीवारंवार शिवीगाळ, धमक्यापाच आरोपींना अटक


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतातील नामवंत उद्योजक आणि हल्दीरामचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपींना धंतोली पोलिसांनी अटक केली. आरोपींचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर नागपुरातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालकासोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. गर्दी झाल्यामुळे त्यांनी प्रसाद वितरणाची जबाबदारी वाहनचालकावर सोपवली आणि ते वाहनात जाऊन बसले. अचानक चार ते पाच जण वाहनचालकासोबत झोंबाझोंबी करू लागले. वाहनचालक धष्टपुष्ट असल्याने त्याने त्या चार पाच जणांनाही हुसकावून लावले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करून खंडणीबाबत वाच्यता केल्याने हा अपहरणाचा प्रयत्न होता, असे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यामुळे अग्रवाल यांच्यावतीने वाहनचालकाने धंतोली ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, दोन महिने निघून गेले. २८ जूनला अपहरणकर्त्यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून त्यांना धमकावणे सुरू केले. ‘२८ जूनला तू बचावला. ५० लाखांची खंडणी दिली नाही तर तू आता वाचणार नाही’, अशी धमकीही आरोपी देत होते. अग्रवाल फोन कापत असल्यामुळे आरोपींनी त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत मेसेज पाठविला. त्यांनी हा प्रकार धंतोली पोलिसांना कळविला. वरिष्ठांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मध्यभारतातील एका प्रमुख उद्योजकांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे आरोपी त्यांना पुन्हा खंडणीसाठी धमकावत असल्याच्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर धंतोली पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचेही पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा समांतर तपास करू लागले.
अखेर छडा लागला
आरोपींनी ज्या मोबाईलचा वापर केला. त्या मोबाईलधारकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने आपला मोबाईल चोरीला गेला होता, त्याची तक्रारही आपण पोलिसांकडे यापूर्वी नोंदविल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे पुन्हा काही नंबर मिळवले. त्यातील एक मोबाईल नंबर पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर) याचा असल्याचे आणि तो संबंधित मोबाईल वापरणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पप्पू ऊर्फ श्यामबहादूर हा मूळचा रायबरेलीचा आहे. आधी तो अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करायचा. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेऊन त्याला २०१४ मध्ये काढून टाकण्यात आले होते. ही पार्श्वभूमी कळताच पोलीस उपायुक्त राकेश ओला, धंतोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पीएसआय अनंत वडतकर, नायक विरेंद्र गुळरांधे, विनोद वडस्कर, दिनेश घुगे, सुरेश जाधव, पंकज हेडावू, हेमराज बेरार, देवेंद्र भोंडे, कमलकिशोर चव्हाण यांनी संशयाच्या आधारे पप्पूला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला बाजीराव दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपणच अपहरणाची टीप दिल्याचे कबूल करून या प्रकरणातील आरोपी सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांची नावे सांगितली. हे सर्व आरोपी रामबाग, इमामवाड्यातील रहिवासी आहेत. सिंगसह या सर्वांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांना पोलिसांनी आज कोर्टात हजर करून त्यांचा ९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या एका फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

शर्ट सारखे घातल्यामुळे टळले अपहरण
अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांच्याकडून किमान ५० लाखांची खंडणी वसुलण्याचा कट आरोपींनी रचला होता. अग्रवाल यांचे नातेवाईक ५० लाख रुपये सहज देतील, असे पप्पूने आपल्या साथीदारांना सांगितले होते. त्यानुसार २८ एप्रिलला पप्पू वगळता अन्य पाच आरोपींनी विनोद गेडामची कार (व्हॅन) घेतली. घरापासूनच आरोपी अग्रवाल यांच्या मागावर होते. मात्र, ट्रॅफिकमुळे अग्रवाल पुढे निघून गेले. मंदिरात प्रसाद वितरित करताना उन्हाचा त्रास झाल्याने ते आपल्या वाहनात जाऊन बसले. अग्रवाल यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाण हा प्रसाद वाटू लागला. आरोपींनी बघितले नव्हते. मात्र, ते निळा शर्ट घालून आहे, असे श्यामबहादूरने सांगितले होते. वाहनचालक चव्हाण यानेही निळा शर्ट घातला होता. त्यामुळे आरोपींनी त्यालाच अग्रवाल समजून मारहाण करीत आपल्या कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला होता.

असे काही घडलेच नाही : अग्रवाल
२८ एप्रिलला आपल्या वाहनचालकासोबत आरोपीची बाचाबाची झाली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी अपहरणाचा कट होता, असे सांगितल्याचे आपल्याला समजते. आपला प्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नाही, असा माहितीवजा खुलासा हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. 

Web Title: Attempt to kidnap Haldiram owner in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.