नागपुरात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांनी नराधमाची काढली नग्न धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 10:57 AM2019-12-02T10:57:49+5:302019-12-02T11:41:39+5:30
घरात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच चिमुकलीची आई तेथे धडकल्याने मोठा अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच चिमुकलीची आई तेथे धडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी एकत्र येऊन नराधमाला बेदम मारहाण केली. त्याला बदडतच संतप्त जमावाने पारडी पोलीस ठाण्यात नेले. रविवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
पीडित बालिका पुनापूर पारडीत राहते. ती आज आपल्या घराच्या दारासमोर खेळत होती. बाजूलाच तिची आई कामात गुंतली होती. याच परिसरात राहणारा आरोपी जवाहर बाबूराव वैद्य (वय ४०) तेथे आला. त्याला बालिका एकटीच दिसल्याने त्याने तिला घरात नेले आणि कपडे काढून तो तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करीत असतानाच बालिकेची आई तेथे धडकली. तिने नको त्या अवस्थेत नराधमाला बघून आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी पळू लागला. महिलेने मुलीच्या वडिलांना सांगितले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. पीडित बालिकेच्या आईने शेजाऱ्यांना झालेली घटना सांगितली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने नराधम जवाहर वैद्यला पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्याचे कपडे फाडले व त्याला तशाच अवस्थेत पोलिस ठाण्यावर नेले.. तेथे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जमावाचा रोष उफाळून आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. पारडी पोलिसांनी आरोपी जवाहर वैद्य याला पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
प्रकरणाला राजकीय रंग !
आरोपी जवाहर वैद्य हा त्या भागातील नगरसेवकाचा नातेवाईक आहे. त्यामुळे या प्रकरणाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तर, काही जणांनी आरोपी मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद करून हे प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याकांडाच्या प्रकरणाने देशभर वातावरण संतप्त केले असताना घडलेल्या या घटनेमुळे तसेच पीडित मुलगी केवळ चार वर्षांची असल्याने या प्रकरणाने पारडीत रात्रीपर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण होते.