बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न: दोन महिला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:37 AM2020-08-15T01:37:23+5:302020-08-15T01:38:35+5:30
गिट्टीखदानमधील एका सराफा दुकानात जाऊन तेथे बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदानमधील एका सराफा दुकानात जाऊन तेथे बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उमा रोहित वानखेडे आणि अनिता विनोद तागडे अशी आरोपी महिलांची नावे असून या दोघीही चंदन नगरात राहतात. फिर्यादी हरीश शंकरराव भुजाडे यांचे सुरेंद्रगड बजरंग चौकात शिवकृष्ण छाया ज्वेलर्स आहे. गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता उमा आणि अनिता त्यांच्या दुकानात गेल्या. या महिलांनी त्यांच्या जवळचे दागिने भुजाडे यांच्याकडे देऊन ते गहाण ठेवायचे आहेत, असे सांगितले. पिवळ्या धातूचे हे दागिने सोन्याचे नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या महिलांना चर्चेत गुंतवून गिट्टीखदान पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमा आणि अनिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.