नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:33 AM2018-04-06T00:33:11+5:302018-04-06T00:33:26+5:30
मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. जखमी प्रणयची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपींसह चौघांना ताब्यात घेतले आहे.
मरारटोली परिसरात नीलेश ऊर्फ बग्गा बाबा कौरती आणि मुकुंद बाबा खंडाते हे बुवाबाजी करायचे. त्यांच्याकडे नेहमी दरबार भरायचा अन् अंगारेधुपारेही चालायचे. या दरबारात झोपडपट्टीतील अंधश्रद्ध मंडळींसोबत कुख्यात गुन्हेगारांचीही नेहमी हजेरी राहायची. आपल्या दरबाराचा प्रभाव वाढवण्यासाठी या दोघांमध्ये वैमनस्य आले. दोघांच्याही हाताशी गुंडांच्या टोळ्या असल्याने तो वाद टोकाला गेला. या पार्श्वभूमीवर, १६ डिसेंबर २०१६ ला आरोपी मुकुंद खंडाते प्रणय कावरे, बाबल्या सेंगर यांनी बग्गाची हत्या केली होती. पाच महिन्यांपूर्वी आरोपी कारागृहातून जामिनावर बाहेर आले. आरोपी प्रणय कावरे त्याच्या आजीसह मरारटोलीत राहायचा. मरारटोलीत त्याने आपला दबदबा निर्माण करण्यासाठी दरबार भरविण्याचा प्रयत्न चालविला होता. दुसरीकडे त्याचा प्रतिस्पर्धी अभिनव गजबेनेही असाच प्रकार चालविला. त्यामुळे या दोघांच्या टोळ्यांमध्ये वादविवाद वाढला होता. पोलीस ठाण्यात तक्रारीही झाल्या होत्या.
सकाळी भांडण, दुपारी हल्ला
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सकाळी प्रणय आणि आरोपींमध्ये पुन्हा भांडण झाले. प्रणयने त्यांना शिविगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. दुपारी १२ च्या सुमारास प्रणय मरारटोलीतील मैदानावर परतला. यावेळी आरोपी हल्ल्याच्या तयारीत असल्याचा अंदाज आल्याने तो मोपेडवरून पळू लागला. आरोपी अभिनव आणि त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून त्याच्या पाठीत धारदार शस्त्राचे वार केले. जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत प्रणय बाजूच्या घरात शिरला. नागरिक जमल्याचे पाहून आरोपी पळून गेले. एकाने ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. तेथून अंबाझरी पोलिसांना घटना कळली. पोलीस पोहचेपर्यंत तेथे मोठी गर्दी जमली होती. जखमी प्रणयला रवीनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अभिनव फरार आहे. या घटनेमुळे मरारटोलीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे.