जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 03:16 PM2022-03-24T15:16:44+5:302022-03-24T15:20:09+5:30
गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीत स्थायी करावे, या मागणीसाठी एका अस्थाई सफाई कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून लगेच त्याला ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.
विनोद नंदकिशोर मेहरुलिया (५२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. टेका नाका झोनमधील अन्न वितरण प्रणाली कार्यालयात तो १९८१ पासून साफसफाईचे काम करतो. ३९ वर्षे होऊनही प्रशासनाने त्याला स्थायी नियुक्ती दिली नाही. त्यामुळे त्याने प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले. तक्रार आणि निवेदनही दिले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मेहरुलिया यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून मेहरुलिया याला ताब्यात घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले समुपदेशन
या घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मेहरोलिया याला समोर बसवून त्याचे समुपदेशन केले. तांत्रिक अडचणी समजावून सांगत त्याला शासकीय नोकरीत सामावून घेता येत नसल्याचे समजावून सांगितले.