नागपुरात बनावट सोने विकण्याचा प्रयत्न फसला : टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 08:14 PM2020-08-28T20:14:11+5:302020-08-28T20:17:16+5:30

बनावट सोने विकणाऱ्या टोळीचे कट-कारस्थान एका व्यावसायिकाने उधळून लावले. या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो बनावट सोने जप्त केले.

Attempt to sell fake gold foiled in Nagpur: Gang busted | नागपुरात बनावट सोने विकण्याचा प्रयत्न फसला : टोळीचा पर्दाफाश

नागपुरात बनावट सोने विकण्याचा प्रयत्न फसला : टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्याची सतर्कता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट सोने विकणाऱ्या टोळीचे कट-कारस्थान एका व्यावसायिकाने उधळून लावले. या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो बनावट सोने जप्त केले.
नीतेश ऊर्फ चिंटू राजू शाहू यांचे जरीपटक्यातील पाटणकर चौकात जय शीतला ट्रेडर्स आहे. १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता दोन आरोपी त्यांच्याकडे सोन्याची दोन नाणी घेऊन आले. जुन्या जमान्यातील अस्सल सोन्याचे हे नाणे असून आम्हाला खड्डा खोदताना नाण्यासोबतच सोन्यासारखा हार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. ते विकत घेता का, अशी विचारणा केली. तयारी दाखवताच १८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता तीन पुरुष आणि एक महिला शाहू यांच्या दुकानात आले आणि त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिवळ्या धातूच्या माळेतून पाच मणी तोडून शाहू यांना दिले. हे असली सोने आहे की नाही याची खात्री करून घ्या, असेही ते म्हणाले. शाहू यांनी त्यांचे मित्र मिथुन अन्ना यांना बोलावले. त्याच्याकडून ते सोन्याचे मणी असली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरोपीजवळ असलेला दोन किलो ५०० ग्रॅम वजनाचा बनावट सोन्याचा हार केवळ तीन लाख रुपये आणि एलसीडीच्या बदल्यात विकायचे ठरले. त्यानुसार २७ ऑगस्टला आरोपी पुन्हा शाहू यांच्याकडे आले. दरम्यान, शाहू यांना आरोपींचा संशय आल्यामुळे त्यांनी जरीपटका पोलिसांना माहिती देऊन बोलावून घेतले. पोलिसांनी आरोपी करण देवीलाल ऊर्फ देवा बघेल (वय २२), राजू बाबूलाल बघेल आणि दीपा देवलाल ऊर्फ देशा बघेल (वय ४२, रा. शेषनगर, मानेवाडा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळचे सुमारे तीन किलो पिवळ्या धातूचे दागिने तपासले असता ते सोने नसल्याचे स्पष्ट झाले. शाहू यांनी सतर्कता दाखविल्यामुळे त्यांची फसगत टळली. नंतर त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी करण आणि राजू या दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Attempt to sell fake gold foiled in Nagpur: Gang busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.