विदर्भाची रेल्वेगाडी हिसकावण्याचा प्रयत्न; प्रवाशांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:57 AM2021-06-07T09:57:48+5:302021-06-07T09:58:09+5:30
Nagpur news गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही विदर्भाच्या वाट्याला आलेली गाडी आहे. या गाडीचा रीवापर्यंत विस्तार करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने आखली आहे. त्यामुळे विदर्भातील प्रवाशांचा कोटा कमी होणार असून त्याचा फटका नियमित प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही विदर्भाच्या वाट्याला आलेली गाडी आहे. या गाडीचा रीवापर्यंत विस्तार करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने आखली आहे. त्यामुळे विदर्भातील प्रवाशांचा कोटा कमी होणार असून त्याचा फटका नियमित प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे ही योजना रेल्वेने रद्द करण्याची मागणी होत आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ११०३९/१११०४० गोंदिया-कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रीवापर्यंत विस्तारीत करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने आखली आहे. विस्तारानंतर या गाडीचा काही कोटा विस्तारीत भागाकडे जाणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कोटा कमी होईल. नागपूर, गोंदिया, वर्धा दरम्यान अपडाऊन करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना याचा त्रास होणार आहे. नागपूरवरून गाड्यांचा विस्तार करण्यात येतो. परंतु बाहेरच्या गाड्यांचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात येत नाही. दुर्गपर्यंत धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला इतवारीपर्यंत विस्तार करणे आवश्यक आहे. तसेच अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस गोंदियामार्गे चालवायला हवी तसेच नागपूर बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये दोन चेअरकारचे कोच लावण्याची आणि नागपूरवरून कोलकाता, दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करणे गरजेचे आहे. परंतु नागपूरवरून गाड्या वाढविण्याऐवजी रेल्वे प्रशासन विदर्भातील गाड्या हिसकावण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे प्रवासी संघटना तसेच रेल्वेच्या जाणकारांतून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेने महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार करण्याची योजना रद्द करण्याची मागणी ते करीत आहेत.
प्रवाशांना त्रास होईल
‘नागपूर, गोंदिया, वर्धा दरम्यान दररोज असंख्य प्रवासी दररोज ये-जा करतात. महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार केल्यास या प्रवाशांना त्रास होणार आहे. तसेच विदर्भातील एक गाडी हिसकावली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या विस्ताराचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मागे घ्यावा.’
-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे
............