धावत्या रेल्वेतून युवतीची लॅपटॉप बॅग चोरण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:33+5:302021-07-11T04:07:33+5:30
नागपूर : मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधून एका युवतीची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. ही घटना भुसावळ रेल्वेस्थानकाच्या आऊटरवर शनिवारी ...
नागपूर : मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधून एका युवतीची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. ही घटना भुसावळ रेल्वेस्थानकाच्या आऊटरवर शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. युवतीने आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी बॅग सोडून धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.
अंकिता तायवाडे (२६) रा. जयताळा ही युवती मुंबईला नोकरी करते. शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे ती नागपूरला आपल्या घरी परत येत होते. ती ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या बी ३ कोचमधून प्रवास करीत होती. तिच्या जवळ ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप होता. भुसावळ येण्यापूर्वी आऊटरवर गाडीचा वेग मंदावतो. त्यामुळे तीन चोरटे रात्री २ वाजता गाडीत शिरले. त्यावेळी अंकिता गाढ झोपेत होती. चोरट्यांनी बी ३ कोचमध्ये प्रवेश करून अंकिताची लॅपटॉप बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती झोपेतून जागी झाल्यानंतर तिला आपली लॅपटॉप बॅग चोरटे घेऊन जात असल्याचे दिसले. घाबरलेल्या अवस्थेत तिने आरडाओरड केल्यामुळे सहप्रवासी तिच्या मदतीसाठी धावले. त्यामुळे चोरट्यांनी लॅपटॉपची बॅग फेकून धावत्या गाडीतून उड्या मारल्या. परंतु जाताना एका प्रवाशाची बॅग ते घेऊन गेले. या घटनेची तिने ऑनलाईन तक्रार केली आहे. दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मुंबई ते भुसावळ आरपीएफची ड्युटी राहत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत.
............
चोरट्यांची टोळी सक्रिय
भुसावळ रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. दोन वर्षांपूर्वी अंकिताच्या वडिलांची बॅगही भुसावळ रेल्वेस्थानकावर पळविण्याचा प्रयत्न झाला होता. भुसावळ येथे अशा घटना नेहमीच घडत असूनही सुरक्षा यंत्रणा काहीच उपाययोजना करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या भागात आरपीएफची गस्त वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
...............