एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: September 6, 2022 04:49 PM2022-09-06T16:49:12+5:302022-09-06T16:50:38+5:30
त्याने प्रितीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : घरखर्च भागविण्यासाठी एटीएमचे कार्ड मागितल्याच्या कारणावरून पतीने स्वत:च्या पत्नीलाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळला. पत्नीने कशीबशी स्वत:ची सुटका करत जीव वाचविला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
वर्मा ले आऊट येथील राम किराणा स्टोअर्सजवळ विश्वजीत ढोणे (३९) हा त्याची पत्नी प्रिती (३४) हिच्यासोबत राहतो. पैशांची आवश्यकता असल्याने पत्नीने विश्वजीतला एटीएम कार्ड मागितले. यावरून तो संतापला व त्याने कार्ड देण्यास नकार देत प्रितीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याने प्रितीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. प्रितीने स्वत:ची सुटका केली व थेट अंबाझरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून विश्वजीतविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.