नागपूरला पर्यटन जिल्हा करण्याचा प्रयत्न
By admin | Published: September 3, 2015 02:42 AM2015-09-03T02:42:05+5:302015-09-03T02:42:05+5:30
नागपूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा, या दृष्टिकोनातून पर्यावरण विकासाबाबत वेगळे धोरण अवलंबावे. जिल्ह्यातील तलाव, धरणे व अभयारण्य यांना जागतिक स्तरावर..
जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : नागपूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा, या दृष्टिकोनातून पर्यावरण विकासाबाबत वेगळे धोरण अवलंबावे. जिल्ह्यातील तलाव, धरणे व अभयारण्य यांना जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त करून देणे व पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. पर्यटनाच्या माध्यामातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका बैठकीत चर्चा केली.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित ३०५ कोटी किमतीचे लायनिंगच्या सात कामांना विस्तार व सुधारानुसार प्रस्तव पाठविण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. पेंच प्रकल्पाच्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त उजवा व डवा कालव्यावरील शाखा कालवे व वितरिकांचे अस्तरीकरणाच्या २९६ कोटी रुपयांच्या ११ कामांना तांत्रिक मान्यता व निविदांसाठी तीन महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. पेंच प्रकल्पाचे मुख्य कालवे मागील दहा वर्षात ४५ वेळा फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मोठी हानी टाळण्यासाठी माती कामाकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाकडून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पेंच प्रकल्पातून दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपये पाणी पट्टी निधी शासनास मिळतो. प्रकल्पाचे देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक ३ ते ४ केटी रुपये मिळतात. हा निधी १० ते १५ कोटी रुपयापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
सिंचन व्यवस्थापनाकरिता नागपूर जिल्ह्यात तीन विभागांतर्गत फक्त १७९ कर्मचारी आहेत. आकृतीबंधानुसार ६१६ क्षेत्रीय कर्मचारी पदे मंजूर आहेत. रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने घेता येणे शक्य आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीत दिले.(प्रतिनिधी)