पैसे न दिल्याच्या कारणावरुन महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 12:48 PM2021-10-13T12:48:41+5:302021-10-13T12:56:27+5:30
पैसे न दिल्याच्या कारणावरुन एका महिलेला जिवंत जाळ्याचा प्रयत्न केल्याची घटना तब्बल पावणेचार महिन्यानंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन जरीपटका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैसे न दिल्यामुळे एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती आता सुधारली असून, तब्बल पावणेचार महिन्यांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
उषा प्रकाश तायडे (वय ५४) असे या महिलेचे नाव असून त्या भीमसेना नगर झोपडपट्टीत राहतात. १८ जूनच्या सायंकाळी त्या परिचित असलेल्या शेराबाबू मेश्राम यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी मेश्राम, त्याची पत्नी रश्मी आणि आई माया यांच्यात वाहनाच्या किस्तीवरून जोरदार वाद सुरू होता. दरम्यान मेश्राम यांना त्यांच्या पत्नीने उषा यांना पैसे मागण्यास सांगितले. मेश्राम यांनी उषा तायडे यांना ३० हजार रुपये मागितले; मात्र तेवढी रक्कम नसल्याचे सांगून उषा यांनी पैसे देण्यास नकार दिला.
दरम्यान उषा कपडे बदलून परत निघाल्या असता, मेश्राम यांची पत्नी रश्मीने उषाच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली; परंतु मेश्राम यांनी तातडीने शरीरावर पाणी टाकून आग विझविली. या घटनेत उषा जखमी झाल्या, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या बयान देण्याच्या अवस्थेत नसल्याने पोलीस विचारपूस करू शकले नव्हते. आता रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर बयान नोंदविले गेले. त्यावरून जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.