आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 08:24 PM2022-10-06T20:24:06+5:302022-10-06T20:24:42+5:30
Nagpur News आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम व भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम व भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे इंदोरा चौकासह संपूर्ण उत्तर नागपुरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चातर्फे ६ ऑक्टोबर रोजी आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने याला मंजुरी नाकारली. न्यायालयाने मंजुरी नाकारली तरी मोर्चा निघेलच असे आयोजकांतर्फे आधीच जाहीर करण्यात आले होेते. त्यामुळे पोलीस आधीच सतर्क होते.
भारत मुक्ती मोर्चाच्या एकेक नेत्यांना डिटेन केले जात हाेते. ज्या बेझनबाग मैदानावर सभा होणार होती आणि सभेनंतर मोर्चा काढण्यात येणार होता. त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तरी कार्यकर्त्यांचे एकत्र यायला सुरुवात झाली. देशभरातून कार्यकर्ते येत होते. दरम्यान बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते संतापले. सर्व कार्यकर्ते इंदोरा चौकात एकत्र झाले. इंदोरा पोलीस चौकीसमोर एकत्र येऊन त्यांनी आरएसएसच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. कार्यकर्त्यांना आवरणे कठीण जात होते. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरु केले. कार्यकर्तेही स्वत:ला अटक करवून घेत होते. परंतु कार्यकर्त्यांची संख्या इतकी अधिक होती की सर्वांनाच ताब्यात घेणे शक्य नव्हते. वामन मेश्राम यांनी स्वत: कार्यकर्त्यांना शांत होत घरी जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्तेही आपापल्या घरी परतले.