नागपूरच्या कोराडी प्रदर्शनात युवकाचा हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:37 AM2018-10-17T00:37:06+5:302018-10-17T00:39:11+5:30
कोराडी परिसरातील प्रदर्शनात पत्नीशी बातचीत करणाऱ्या ३५ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरचा आरोपी पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी परिसरातील प्रदर्शनात पत्नीशी बातचीत करणाऱ्या ३५ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरचा आरोपी पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता घडली.
सुनील वासुदेव परतेकी असे जखमीचे नाव असून तो खंडाला, पारशिवनी येथील रहिवासी आहे. आरोपी पती शुद्धोधन चैतराम लांजेवार (३६) असून तो करंभाल, पारशिवनी येथे राहतो.
प्राप्त माहितीनुसार, शुद्धोधन आणि सुनील परतेकी यांचे पूर्वी घरगुती संबंध होते. यादरम्यान शुद्धोधनला सुनीलचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. शुद्धोधनची पत्नी प्रदर्शनात तिकीट काऊंटर सांभाळते. त्यामुळे त्याने पत्नीला सुनीलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. सुनील पत्नीला भेटत असल्याची माहिती त्याला मिळाली. सोमवारी शुद्धोधन प्रदर्शनाजवळच दोघांवर लक्ष ठेवून होता.
टॅक्सी ड्रायव्हर सुनीलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनील कोराडी मंदिरात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता दर्शनासाठी आला होता. यावेळी प्रदर्शनात काऊंटरजवळ शुद्धोधनच्या पत्नीची भेट झाली. दोघांची बातचीत सुरू असतानाच शुद्धोधन त्या ठिकाणी पोहोचला. शुद्धोधनने सुनीलला त्याच्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला देतानाच मारून टाकण्याची धमकी दिली आणि त्याचवेळी धारदार शस्त्राने हल्ला केला. सुनीलच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक जी. कंकाल यांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणाची नोंद केली.