बेलतरोडीत दरोड्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:39+5:302020-11-22T09:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बेसा बेलतरोडी परिसरात शुक्रवारी पहाटे एका घरात दरोडेखोर शिरले. त्यांनी घरमालक आणि त्यांच्या मुलावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बेसा बेलतरोडी परिसरात शुक्रवारी पहाटे एका घरात दरोडेखोर शिरले. त्यांनी घरमालक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक शस्त्राने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
साकेतनगरच्या प्रिया को-ऑप. सोसायटीत रमण काशीनाथ गिरडकर राहतात. ते अभियंता म्हणून नुकतेच शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या मालकीचा बेसात जीमही आहे. त्यांचा मुलगा विपुल हा मेडिकल स्टोअर्स चालवितो. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर हे सर्व गप्पा करत बसले आणि आपापल्या रुममध्ये झोपायला गेले. घाईगडबडीत दार आतून बंद करायचे विसरले. पहाटे ३ च्या सुमारास त्यांना घरात कुणी शिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आवाज दिला असता तीन ते चार आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आईवडिलांचा आवाज ऐकून विपुल धावत आला. दरोडेखोरांनी त्याच्यावरही चाकूने हल्ला चढवून त्याला जबर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरातील लाईट लावल्यामुळे दरोडेखोर पळून गेले.
गिरडकर यांनी बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी गिरडकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
---
काय आहे कारण ?
दरोडेखोरांनी घरातील कोणतीही चिजवस्तू नेली नाही. त्यामुळे हा दरोड्याचाच प्रयत्न होता की दुसरे काही कारण या गुन्ह्यामागे दडले आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
---