नागपूर जिल्ह्यात उमरेड येथे महिलेच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 01:00 PM2021-08-04T13:00:05+5:302021-08-04T13:02:52+5:30

Nagpur News उमरेड येथील सिंधी कॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मंगळवारी मध्यरात्री १.४० ते १.४८ वाजताच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारे नाट्य घडले.

Attempted robbery at Umred in Nagpur district foiled by a woman's vigilance |  नागपूर जिल्ह्यात उमरेड येथे महिलेच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी

 नागपूर जिल्ह्यात उमरेड येथे महिलेच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी

Next
ठळक मुद्देसात दरोडेखोरांनी केला पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथील सिंधी कॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्न  अपयशी ठरला. मंगळवारी मध्यरात्री १.४० ते १.४८ वाजताच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारे नाट्य घडले. केवळ आठ ते दहा मिनीटांच्या वेळातच दरोडेखोरांनी परिसरात ‘एन्ट्री मारली आणि पोबारा केला’ असा संपर्णू घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रसंगामुळे परिसरात दहशतीचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


उमरेडच्या सिंधी कॉलनी परिसरात एकाच आवारात सेवकराम तोलानी, घनश्याम तोलानी आणि महेश तोलानी या तिनही बंधूच्या इमारती आहेत. सर्व गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी सेवकराम तोलानी यांच्या भिंतीवरून उडी मारत थेट महेश तोलानी यांच्या इमारतीकडे आगेकूच केली. एक एक करीत सातही दरोडे इमारतीच्या परिसरात शिरले. खिडक्यांची तावदाने तपासली. इमारतीच्या आत प्रवेश कसा करता येईल, याची चाचपणी देखील या दरोडेखोरांनी केली.


दरम्यान सगळेच गाढ झोपेत असताना दुसरीकडे प्रिया तोलानी या बेडरूमध्ये टि.व्ही बघत होत्या. शिवाय मोबाईल सुद्धा त्यांच्या हातात होता. अशातच त्यांच्या खोलीतील खिडकीतून टॉर्च चमकला. त्या लगेच सावध झाल्या. लागलीच त्यांनी मुलगा निकेश आणि सुनेला हाक दिली. निकेशने खिडकीजवळ पोहोचताच घराबाहेर दरोडेखोर असल्याचे लक्षात आले. ‘चोर-चोर’ च्या आवाजाने घरातील सारेच जागे झाले. आवाज घुमला आणि क्षणार्धात दरोडेखोरांनी पोबारा केला.


उमरेड पोलीसांना सूचना दिल्यानंतर लगबगीने पोलीस पोहाचले. त्यांनी त्या दिशेने शोधही घेतला परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून एकूण सात जणांच्या या टोळीमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चेला ऊत आला आहे. वृत्त लिहीस्तोवर याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

दरवाजा उघडला असता तर...
बाहेर एक नव्हे अनेक दरोडेखोर असल्याची बाब घरातील सदस्यांच्या ध्यानात येताच सर्वांचीच भंबेरी उडाली. खिडकीतून दरोडेखोर आमनेसामने दिसत होते. अशातच सर्वांनीच ‘चोर’ आल्याचा आरडाओरडा सुरू केला. सतर्कता बाळगत घराचा दरवाजा कुणीही उघडला नाही. कदाचित बाहेर कोण आहे, हे बघण्यासाठी दरवाजा उघडला गेला असता, तर मोठा अनर्थ झाला असता, अशीही बाब महेश तोलानी यांनी सांगीतली. ‘पोलीस पोलीस - चोर चोर’ या आवाजामुळे सातही चोरटे पळत सुटले.

माहिती कळताच पोलीस पोहोचले. वेगवेगळ्या चमू कामाला लागल्या.  चोरट्यांनी केवळ प्रयत्न केला. काहीही घडले नाही. यामुळे सध्या गुन्हा दाखल करण्यात आला नाही’’
यशवंत सोलसे
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरेड

--------------------

Web Title: Attempted robbery at Umred in Nagpur district foiled by a woman's vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dacoityदरोडा