जागेच्या वादातून शस्त्राने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
By दयानंद पाईकराव | Published: September 23, 2023 04:11 PM2023-09-23T16:11:53+5:302023-09-23T16:12:14+5:30
हजारीपहाड येथील घटना
नागपूर : जागेच्या वादावरून तीन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
शुभम बापू चौधरी (वय २७, रा. रा. संजयनगर पांढराबोडी), पूजा बापू चौधरी (वय २८, रा. ईसासनी हिंगणा) आणि काेमल राजु तिवारी (वय २८, रा. चिंतामणीनगर, भिवसनखाेरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २२ सप्टेंबरला रात्री ८ वाजता निलेश देवानंद चोरे (वय २६, रा. पंचशील बौध्द विहाराजवळ, हजारी पहाड) हा त्याचे घराशेजारी राहणारा मित्र अनिकेत दिपक गौरखेडे (वय २३) याच्यासोबत हजारीपहाड येथील चिंचेच्या झाडाखाली अंडयाचे ठेल्याचे बाजुला ऊभे होते. आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह चिंतामणी नगर येथील जागेच्या वादावरून निलेशला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच निलेशचा मित्र अनिकेतला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी नीलेशने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.