योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

By admin | Published: December 26, 2015 03:51 AM2015-12-26T03:51:33+5:302015-12-26T03:51:33+5:30

धनश्री लेकुरवाळे या नागपूरच्या योगपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करीत पदक प्राप्त केले.

Attempts to include Yoga on the whole of government | योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

Next

चंद्रशेखर बावनकुळे : योगपटू धनश्री लेकुरवाळेला युवा नागभूषण अवॉर्ड प्रदान
नागपूर : धनश्री लेकुरवाळे या नागपूरच्या योगपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करीत पदक प्राप्त केले. यामुळे विदर्भाचा आणि देशाचा गौरव वाढला. ही बाब आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे. पण राज्य शासनाने अद्याप योगाचा समावेश क्रीडा प्रकारात मान्य केलेला नाही. योगाचा समावेश शासनस्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नागभूषण फाऊंडेशनच्यावतीने विदर्भाचा लौकिक राज्य व देशपातळीवर वाढविणाऱ्या विद्यार्थी युवक-युवतीला युवा नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री सुधीर लेकुरवाळे हिला ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, माजी खा. दत्ता मेघे, उद्योजक ए. के. गांधी, गिरीश गांधी, उद्योजक प्रभाकरराव मुंडले, सत्यनारायण नुवाल उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, अनेक लोक प्रतिभावंत असतात पण परिस्थितीमुळे त्यांना मागे यावे लागते. असे प्रतिभावंत आपली आणि देशाची संपत्ती आहे. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही धनश्रीच्या पालकांनी तिला मदत केली त्यामुळेच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करू शकली. योगपटूंना सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संधी असून पंतप्रधानांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कृपाल तुमाने म्हणाले, धनश्रीची प्रतिभा पाहून तिला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आपल्याला शक्य ती मदत करायला आवडेल. नागभूषण पुरस्कार सुरू करून अनेकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते आहे. या पुरस्काराची त्यामुळेच समाजाला गरज आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उंची गाठणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यात धनश्रीला देण्यात येणारा सन्मान एका योग्य खेळाडूचा गौरव आहे. दत्ता मेघे म्हणाले, विदर्भाचा गौरव वाढविणाऱ्या धनश्रीने भविष्यात योगाचा प्रचार-प्रसार करावा आणि आरोग्यसंपन्न समाज निर्मितीचा प्रयत्न करावा. सत्काराला उत्तर देताना धनश्री म्हणाली, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यावरही पॅरिसला जाता आले नाही. पण खा. तुमाने यांनी मदत केल्यामुळेच मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच मेडल मिळविता आले. आता मदत मिळते आहे आणि भविष्यात भारताचे नाव अधिक उंच करण्याचा मी प्रयत्न करेन. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर निवेदन किशोर गलांडे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Attempts to include Yoga on the whole of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.